Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Sangli › बाल सुधारगृहातून पळालेल्यांचा कसून शोध

बाल सुधारगृहातून पळालेल्यांचा कसून शोध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील दादूकाका भिडे बालसुधारगृहातून पलायन केलेल्या पाच अल्पवयीन संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. संशयितांची छायाचित्रे व माहिती जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दिली आहेत.  पथकांच्या सहाय्याने शोध सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बालसुधारगृहातून सराईत बाल गुन्हेगारांसाठी स्वतंत्र खोली आहे. या खोलीत सहाजण होते. नेहमी प्रमाणे रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपले होते. शुक्रवारी रात्री हेक्सॉब्लेडच्या सहाय्याने खिडकीचे गज कापून पाचजण पळाले. पळालेल्यात तीन घरफोडीतील संशयित आहेत.  तर एकजण मंगळवारी केलेल्या खुनातील संशयित आहे. त्याचा सहभाग या पूर्वीच्या  एका खुनाच्या आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात होता. त्यावेळीही त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

काही महिन्यापूर्वी तो जामिनावर सुटून बाहेर आला होता.  गुरुवारी त्याला खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले होते.  त्याच रात्री पाचजणांनी पलायन केलेे. विविध गुन्ह्यात तो सराईत झाला असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू  केले आहेत. या पाचही जणांच्या घरांची तपासणी पोलिसांनी केली. मात्र ते मिळाले नाहीत. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रमुख पोलिस ठाण्यात या पळालेल्या संशयितांची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांची काही पथके तयार करून शोध घेण्यात येत आहे.