होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार 

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:13AM

बुकमार्क करा
वडूज : वार्ताहर

खटाव तालुक्यातील चार नराधमांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्यात आलेल्या संतप्‍त जमावाने संशयितांवर हल्ला करत चोप दिला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगवले. याप्रकरणी पोलिसांनी चारही संशयित आरोपींना अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.  

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीवर 15 दिवसांपूर्वी सलग दोन दिवस चार नराधमांनी अतिप्रसंग केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या चुलतभावास शंका आल्याने त्याने पीडितेच्या आईसमोर शंका व्यक्‍त 

करून पीडितेबरोबर बोलण्यास सांगितले. त्यानुसार आईने पीडितेला छेडले असता, तिने रडतच अतिप्रसंग झाल्याचा प्रकार सांगितला. त्यावेळी आईसह सर्व कुटुंब हादरून गेले. पीडितेने आईला सांगितल्यानुसार गावातीलच नागेश रमेश गोरवे, योगेश बाळासाहेब लोहार, चंद्रकांत सत्यवान खरात, सुजित विलास काळे हे  चार जण पीडितेचा काही दिवसांपासून पाठलाग करत होते. 15 दिवसांपूर्वी हे सर्वजण पीडितेच्या घरी आले. त्यावेळी पीडितेचे आई-वडील शेतात गेले होते. त्या चौघांपैकी एकाने पीडितेला माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत तिला मिठी मारली आणि ओढत घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो घरातून बाहेर आला आणि त्याचा मित्र पुन्हा घरात जाऊन चाकूचा धाक दाखवून त्यानेही पीडितेवर बलात्कार केला. बाहेर जाताना या संशयितांनी पीडितेला हा प्रसंग कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने घाबरून वाच्यता केली नाही. पुन्हा दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेला हे चौघे संशयित पीडितेचे आई-वडील कामासाठी बाहेर गेले असता तिच्या घरी गेले. पुन्हा तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. दुसर्‍या दिवशीही त्यांनी हा प्रसंग कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडित मुलगी गप्प राहिली. या प्रकाराने मन:स्थिती बिघडल्याने पीडिता घरीच झोपून राहिली. मात्र, तिच्या चुलतभावाला याबाबत शंका आल्याने त्याने पीडितेच्या आईशी संवाद साधल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सर्व कुटुंबच हादरून गेले. त्यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले. दरम्यान, याचवेळी गावात घडलेल्या प्रकाराची माहिती समजल्यानंतर संतप्त जमावही पोलिस ठाण्याकडे आला. पोलिसांनी संशयितांना आणल्यानंतर गाडीतून उतरून संशयितांना ठाण्यात नेत असताना संतप्त जमावाने संशयितांवर हल्ला करून चोप दिला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी तत्काळ जमावाला बाजूला सारत संशयितांना ठाण्यात नेले. रात्री उशिरा चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून नागेश गोरवे, योगेश लोहार, चंद्रकांत खरात व सुजित काळे या चौघांनाही अटक करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस ठाणे तसेच वडूज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी तातडीने वडूज येथे धाव घेतली, तर एसआरपीची एक टीम तातडीने तैनात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वातावरण निवळण्यासाठी पोलिस दल प्रयत्नांची शिकस्त करत होते.