Sun, May 26, 2019 13:28होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीची छेडछाड; रिक्षाचालकाला अखेर अटक

अल्पवयीन मुलीची छेडछाड; रिक्षाचालकाला अखेर अटक

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 8:16PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्‍लील वर्तन करून तिची छेड काढल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरोधात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय बाळासाहेब शिंदे  (वय 44, रा. गांधी कॉलनी, विश्रआमबाग) याला अटक करण्यात आली आहे. त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. 

याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनातून शाळेत जाते. सोमवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर ती रिक्षात बसण्यासाठी शाळेबाहेर आली. त्यावेळी संशयित तिच्याकडे गेला. तिच्याशी त्याने अश्‍लील वर्तन केले. मुलीला घरी सोडेपर्यंत हा प्रकार सुरू होता असे फिर्यादीत म्हटले आहे. घरी गेल्यानंतर मुलीने पालकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी संशयित उदय शिंदे याच्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्याने विश्रामबाग पोलिसांनी तो गुन्हा संजयनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

विद्यार्थी वाहतुकीवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह...

नुकतेच वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयाने अनधिकृत विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकाकडून विनयभंगासारखा गंभीर प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेकायदा विद्यार्थी वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.