Mon, May 27, 2019 07:03होमपेज › Sangli › कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी केली पेरणी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी केली पेरणी

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 19 2018 8:37PMऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

कृषीमंत्री सदाभाऊ खोत रविवारी शिराळा तालुक्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी ऐतवडे बुद्रूकमधून जाताना रस्त्याच्या बाजूला एका शेतात शेतकरी पेरणी करत असलेले पाहून सदाभाऊंनी लागलीच आपला ताफा थांबवून थेट शिवारात धाव घेतली आणि बैलजोडी व कुर्‍या हाती घेतल्या.

सदाभाऊंनी यापूर्वी आपल्या शेतात पेरणी, मशागत केली आहे. मात्र आता मंत्री झाल्यानंतरही ते पेरणी करत असल्याचे पाहून शेतकरी भारावले. यावेळी सदाभाऊंनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना, कशाची पेरणी झाली, बियाणे कोठून घेतले यासह विविध गोष्टींची माहिती घेतली. काही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्यास सांगितले. 

यावेळी शेतकरी अमोल वंडकर म्हणाले, शेतकरी चळवळीतील एक नेता मंत्री झाला, याचा आम्हाला अभिमान आहे. अजूनही गावगाड्यातला आमचा हा मंत्री शेतात आला आणि राबला. सदाभाऊंनी काळ्या मातीशी इमान जपले आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषीमंत्री शेतकर्‍याबरोबर शेतात येऊन राबतो, हे चित्र पहावयास मिळाले.

यावेळी शेतकरी अमोल वंडकर यांच्यासह शेतकर्‍यांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी दि. बा. पाटील, सचिन पायमल, सचिन गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, विश्‍वास पायमल, नागनाथ गायकवाड,  विनायक जाधव, संजय पवार यांच्यासह  शेतकरी उपस्थित होते.