Wed, May 27, 2020 02:27होमपेज › Sangli › क्षयरोग निर्मूलनात सर्वांचा सहभाग गरजेचा

क्षयरोग निर्मूलनात सर्वांचा सहभाग गरजेचा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:59PMसांगली : प्रतिनिधी

क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची समस्या आहे. देशात दरवर्षी 29 लाख नवीन क्षयरुग्ण सापडतात. त्यापैकी 4 लाख 20 हजार क्षयरोगी दरवर्षी दगावतात. यातून दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि संपूर्ण औषधोपचारांची आवश्यकता आहे. क्षयरोग निर्मूलनाकरिता सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

खासगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेते यांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात सीमाभागातील रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आढळलेल्या क्षयरोग रुग्णांमध्ये सीमाभागातील रुग्णांचाही समावेश असू शकतो. त्या छुप्या रुग्णांचा शोध घेणे गरजेचे आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती द्यावी. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. राजाभाऊ येवले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुजाता जोशी यांनी केले. सूत्रसंचलन पी. एन. काळे यांनी केले. डॉ. मिलिंद गेजगे यांनी आभार मानले.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, डॉ. माधव ठाकूर, डॉ. रवींद्र ताटे, सागर भोरे यांच्यासह खासगी वैद्यकीय व्यावसायिक, औषधे विक्रेते, आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.