Mon, May 25, 2020 20:20होमपेज › Sangli › प्रत्येक तालुक्यात  एक ‘वृद्धाश्रम’

प्रत्येक तालुक्यात  एक ‘वृद्धाश्रम’

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 11:55PM

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर

प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी वृद्धाश्रम सुरू करण्याचे  शासनाचे धोरण असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी जिल्हा आढावा बैठकीत दिली.

आमदार सुधीर गाडगीळ,  जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी सचिन कवले, राधाकिशन देवरे आदी उपस्थित होते. 

ना. आठवले  म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये एकच शासकीय वृद्धाश्रम आहे. 50 लोकांसाठीच्या या वृद्धाश्रमात  जागा कमी पडत असल्याने प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

रिपाइंचे वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी तक्रार केली की, इस्लामपूर येथे शासनाने लाखो रुपये खर्चून दोन वसतिगृहे बांधली  आहेत. मात्र त्या इमारतीत वसतिगृह सुरू केलेले नाही. घरकुल योजनेसाठी दीड लाखांचे अनुदान कमी पडते. ते वाढवावे, अशी मागणी माजी महापौर विवेक कांबळे यांनी केली. रमाई आंबेडकर उद्यानासाठी महापालिकेने दोन एकर जागा दिली आहे. व 35 लाखांचा स्वतःचा  बाजूला काढून ठेवला आहे. या प्रशस्त उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पाच महामानवांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत. या उद्यानासाठी शासनाची मंजुरी व 90 टक्के  रक्कम (म्हणजेच 3 कोटी 15 लाख रुपये) महापालिकेला द्यावेत. म्हणजे लवकरच उद्यान सुरू करता येईल. असा प्रस्ताव  आयुक्‍त खेबुडकर यांनी मांडला. 

कोथळे प्रकऱणामुळे जिल्हा बदनाम

अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळे पोलिस खात्याला कलंक लागला आहे. कायद्याने थर्ड डिग्री वापरता येत नाही. काही पोलिस ती वापरतात. अशा पोलिसांना कामावर ठेवूच नये. या घटनेबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून  आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे  आठवले यांनी सांगितले.