Sat, Aug 24, 2019 23:34होमपेज › Sangli › शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या गळ्यात गळे कसे काय? : ना खोत

शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या गळ्यात गळे कसे काय? : ना खोत

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 26 2018 12:13AMइस्लामपूर/कसबे डिग्रज : वार्ताहर

खासदारकी वाचविण्यासाठी  शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या  गळ्यात गळे घालणारे खासदार राजू शेट्टी  सन्याशांचा ड्रेस घालून राजकारण करीत आहेत.  सहा महिन्यांपूर्वी त्यांचेच कार्यकर्ते विरोधात गेल्यानंतर त्यांना गुन्हेगार दिसू लागले आहेत.  त्यामुळे आता जनताच कोण वाईट कोण चांगला ठरवेल, असे आव्हान ना. सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिले.  मंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यातील गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या घटनेचे पडसाद मिरज पश्‍चिम भागात उमटले.

या हल्ल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या कार्यकत्यार्र्ंनी सांगली - इस्लामपूर मार्गावर डिग्रज फाटा येथे रस्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

 ना. खोत म्हणाले,  आम्ही खासदारकी, आमदारकी वाचविण्यासाठी  राजकारणात आलो  नाही. पण त्यांना  आता  खासदारकी जाईल, याची भिती वाटू लागली आहे. ते  आता  शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या गळ्यात गळे घालून फि रू लागले आहेत.  त्यांनी शेतकर्‍यांच्या रक्‍ताशी बेईमानी केली आहे. त्यामुळे  शेतकरी त्यांना माफ  करणार नाहीत.  ते व्यक्तीद्वेषांनी पछाडले आहेत. त्यामुळे  काहीही आरोप करत सुटले आहेत. पण  वेळ आल्यावर  सर्व काही बाहेर येईल. कालपर्यंत  ज्यांच्या जीवावर आंदोलन करीत होता, ते लोक तुमच्या विरोधात गेल्याने, ते आता गुन्हेगार दिसू लागले आहेत.  त्यामुळे याचा निकाल आता जनताच लावेल, असे ते म्हणाले.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विनायक जाधव म्हणाले, राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीवर स्वाभिमानी

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला अशोभनीय आहे. रयत क्रांती संघटनेने अशा विचारांना कधीच थारा दिलेला नाही. मात्र असे प्रकार होत असतील तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी अमोल कदम, शीतल चौगुले, अमित टेंबुर्ले, दत्ता शिंदे, सचिन टेंबुर्ले, सुनील कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.