Wed, Apr 24, 2019 15:37होमपेज › Sangli › आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीचा विचार

आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीचा विचार

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 10:55PMसांगली : प्रतिनिधी

आंतरजातीय विवाह केल्यास पती-पत्नीपैकी एकास सरकारी नोकरी देण्याचा विचार आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे केली. जातीयता नष्ट होऊन समाज  एकरूप होण्यास आंतरजातीय विवाह महत्वाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेत शनिवारी आंतरजातीय विवाहित दांपत्यांचा सत्कार ना. आठवले यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी खासदार संजय पाटील होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुरेश खाडे, भाजप युवा मोर्चाचे गोपीचंद पडळकर,  सभापती तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे प्रमुख उपस्थित होते. 

‘आंतरजातीय विवाहितांचा होत आहे सत्कार, हा तर आहे एक चमत्कार’ ही कविता सादर करत आठवले यांनी भाषणाची सुरूवात केली. 

ते म्हणाले, कोणत्याही एका समाजाच्या मतावर निवडून येणे शक्य नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्यातच सर्वांचे हित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. हा पक्ष केवळ एका जातीपुरता मर्यादित न राहता तो सर्व जाती, जमातींचा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.  सर्व समाजात रोटी-बेटी व्यवहार झाले तर जातीयता शिल्लक राहणार नाही असे ते म्हणत होते.  महात्मा बसवेश्‍वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना करत आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. समाजात परिवर्तन होत आहे. मराठा-दलित एकत्र येत आहेत.  

नोकरीचा विचार.. क्‍लास लावा

आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाहासाठी राज्य शासन 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देते.  त्यात वाढ केली पाहिजे. केंद्र शासन 2.50 लाख रुपये अनुदान देत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास दोघापैकी एकाला सरकारी नोकरी देण्याचा विचार आहे. नोकरी लागत नाही, त्याने बायको शोधायला लागावे. आंतरजातीय विवाहासाठी ट्रेनिंग घ्या, क्‍लास लावा, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.  

संजय पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 34 हजार अपंगांना शासकीय योजनांच्या लाभासाठी महिन्यात मंत्री आठवले यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम घेऊ. आमदार खाडे म्हणाले, प्रेम केले तर लग्न करा. लग्न केले तर ते शेवटपर्यंत निभावून नेण्याची हिंमत ठेवली पाहिजे. आंतरजातीय विवाहांसाठी राजकारणी, शासन, प्रशासन पाठिशी राहील. 

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्ह्यात आंतरजातीय विवाहित 117 दांपत्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला आहे. केंद्र, राज्य शासनाच्या अनेकविध योजनांचा लाभ ‘समाजकल्याण’च्या माध्यमातून  दिला जात आहे. विकास साधला जात आहे. पडळकर म्हणाले, आंतरजातीय विवाह केंद्रीय प्रस्तावातील अटी शिथील कराव्यात. दलितवस्ती सुधारणा योजनांसाठी भरीव निधी द्या. 

जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, सरदार पाटील, अश्‍विनी पाटील, अ‍ॅड. शांता कणुंजे, महादेव दुधाळ, भगवान वाघमारे, प्रा. दादासाहेब ढेरे, संजय कांबळे, सुरेश दूधगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.