Sun, Jan 20, 2019 06:08होमपेज › Sangli › कारखान्यांच्या वजन काट्यांचेे ऑडिट करणार

कारखान्यांच्या वजन काट्यांचेे ऑडिट करणार

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 10:03PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

राज्यातील पेट्रोलपंपाची तपासणी करून ज्याप्रमाणे ऑडिट करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे तपासून त्यांचे ऑडिट करण्यात येईल. त्यासाठी पोलिस आणि वजनमापे नियंत्रण  विभाग यांचे पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती अन्न-औषध प्रशासन, नागरी पुरवठा व वजनमापे मंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, पेट्रोलपंपावरील घोटाळ्यास यापुढे पेट्रोल कंपनीच्या अधिकार्‍यांनाही यापुढे जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  ते म्हणाले, राज्यातील पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली. यातील दोषींवर कारवाईचे काम सुरू आहे.  काही पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे वजनकाटे विभागामार्फतही मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम राबवताना काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्यात येतील. या विभागाकडे कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पोलिस विभागाची मदत घेण्यात येईल. साखर कारखान्यांचे वजन काटेही तपासण्यात येतील. यातील दोषींच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. 

ते म्हणाले, आतापर्यंत पेट्रोल पंपचालक आणि मालकांना या घोटाळ्यात जबादार धरले जात होते. यापुढे संबंधित अधिकार्‍यांनाही दोषी धरले जाणार आहे. पेट्रोलपंपावरील मशिनमध्ये काही बदल केल्यास त्याची माहिती संबंधित कंपनीस तातडीने मिळणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर कृत्यास आळा बसेल. तेलाचे माप घेण्यासाठी यापुढे काचेचे माप वापरले जाणार आहे. कोणत्याही दुकानात छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दुष्काळी भागातील 58 लाख शेतकर्‍यांना अल्पदरात धान्य देण्यात येत आहे.