Wed, Feb 26, 2020 10:32होमपेज › Sangli › अन्‍नभेसळीसाठी प्रसंगी ‘मोका’

अन्‍नभेसळीसाठी प्रसंगी ‘मोका’

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:54AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

दुधापासून विविध खाद्यपदार्थांतील भेसळीचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने तो विषय गांभीर्याने घेतला आहे. भेसळ प्रकरणात  दोषी आढळणार्‍यांवर निलंबनापासून ‘मोका’ लावण्यापर्यंतची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्‍न-औषध प्रशासन आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. 

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीता केळकर आदी उपस्थित होते. ना. बापट यांनी जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

ते म्हणाले, राज्यातील सर्व शिधापत्रिका आधारकार्डाशी जोेडण्याचे काम सुरू आहे.   आतापर्यंत 12 लाख बोगस शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. ते म्हणाले, विविध विभागातील कायदे हे केंद्रातील तरतुदीनुसार आहेत. त्यापैकी अनेक कायदे बदलत्या काळानुसार कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे अनेकदा दोषींवर कारवाई करताना मर्यादा येतात. हे कायदे बदलण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाबरोबर आमची चर्चा सुरू आहे. कायद्यात बदल करून कडक शिक्षा होईल, अशा द‍ृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. 

ते म्हणाले, शंभर टक्केआधार जोडणीचे काम तीन महिन्यांत पूर्ण होईल. वृद्धांसंदर्भात अंगठ्याऐवजी डोळ्यांची बुबुळे आधारला लिंक  करण्यात येत आहेत. राज्यातील 52 हजार रेशनदुकानदारांचे काम ऑनलाईन सुरू झाले आहे. बायोमेट्रिक मशिनमुळे राज्यातील कोणत्या दुकानात काय सुरू आहे, याची माहिती कोणत्याही ठिकाणी बसून मिळते. गोदामे ऑनलाईन झाली आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असून गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. बेकायदा शिधापत्रिका देणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.