Fri, May 24, 2019 08:54होमपेज › Sangli › गडकरींनी हात जोडले, दादांनी दखल घ्यावी

गडकरींनी हात जोडले, दादांनी दखल घ्यावी

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हात जोडले आहेत. त्यामुळे बांधकाम खात्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी त्याची दखल घ्यावी, असा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत लगावला.  मुंबईतील खड्ड्यांबाबत ओरडणार्‍या आशिष शेलार यांनाच त्याबद्दल विचारा असेही ते म्हणाले.

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रावते बुधवारी सांगलीत आले होते. ते म्हणाले, एस.टी. महामंडळात आता आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एस.टी.च्या सेवेत अनेक बदल केले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत महामंडळाने कोठेही बांधकाम केले नव्हते. आता राज्यात महामंडळातर्फे दोनशे ठिकाणी विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत. 

ते म्हणाले, पूर्वी एसटीच्या अपघातातील मृत व्यक्‍तींना फारच कमी भरपाई देण्यात येत होती. आता ती रक्कम दहा लाखांपर्यंत वाढविली आहे. सांगलीतील बसस्थानकाच्या बांधकामाबाबत आंतरराष्ट्रीय निविदा काढली आहे. त्याला अजून प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यातील सर्व बसस्थानकावरील शौचालये स्वच्छ तसेच व्यवस्थित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.  ना. रावते म्हणाले, सांगलीतील आरटीओ कार्यालयासाठी नव्याने जागा मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या जागेची पाहणी करण्यात येईल. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पातून यासाठी निधी कमी पडतो आहे. तरीही निधीची तरतूद करून  ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. मराठा आरक्षणाला सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाने मूक मोर्चे काढून एक चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांना आरक्षण मिळाल्यास त्याचे श्रेय कोण घेईल. 

निष्क्रीय पदाधिकारी बदलणार

सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सर्व मतदारसंघांचा आढावाही घेतला आहे. जे पदाधिकारी निष्क्रीय असतील त्यांना नक्कीच बदलण्यात येईल, असेही रावते यांनी यावेळी सांगितले.  यावेळी आनंदराव पवार, संजय विभुते, दिगंबर जाधव, शेखर माने, बजरंग पाटील, सुनीता मोरे, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.