Wed, Feb 20, 2019 08:37होमपेज › Sangli › भाजपच्या झंजावातामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 

भाजपच्या झंजावातामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:56PMकुपवाड : वार्ताहर 

भाजपच्या झंझावाताला घाबरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करावी लागली आहे. तेथेच भाजपचा पहिला विजय झाला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एकहाती सत्ता असूनही गेल्या वीस वर्षांत काँग्रेसला नागरिकांना साधे शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते देता आले नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. येथे आयोजित  कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे उपस्थित होते.

ते म्हणाले, महापालिकेत सत्ता द्या, कुपवाडसाठी दुसर्‍या अमृत योजनेतून 143 कोटी निधी देऊ. ड्रेनेज योजना पूर्ण करून  संपूर्ण कुपवाड शहर डासमुक्त करू.ना. पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत एकट्या भाजपने 78 ठिकाणी सक्षम उमेदवार उभे केले आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करूनही त्यांना  71 ठिकाणी उमेदवार उभे करता आले.  

ते म्हणाले, काँग्रेसला  शहरात शुद्ध पाणीपुरवठा कधी करता आला नाही. नागरिकांना होणारे 90 टक्के आजार अशुद्ध पाण्यामुळे होत आहेत. सताधार्‍यांच्या गैरकारभाराला जनता कंटाळली आहे. तीनही शहरांत विकासकामांसाठी भाजपला एकहाती सत्ता द्या. आमदार  गाडगीळ व  आमदार  खाडे यांची भाषणे झाली. प्रकाश ढंग यांनी स्वागत केले.भीमाप्पा बुदनाळे यांनी आभार मानले.