होमपेज › Sangli › कृषी राज्यमंत्र्याच्या गावातच लाखोंचा घोटाळा                                                                                                                   

कृषी राज्यमंत्र्याच्या गावातच लाखोंचा घोटाळा

Published On: Mar 12 2018 6:43PM | Last Updated: Mar 12 2018 6:43PM



सांगली : प्रतिनिधी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावातच कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप, वीज कनेक्शन नसलेल्या 28 जणांना कृषी पंप आणि जमीन नसताना कृषी योजनांच्या अनुदानाचा लाभ देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी आयोजीत केलेल्या बैठकीत आज ही बाब समोर आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक आज (सोमवार) आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी  चार पिशव्यातून आणलेले भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. या पुराव्या संदर्भात या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा कृषी अधिक्षक  राजेंद्र साबळे यांना दिले. तर या संपूर्ण योजनेची जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.  

बी. जी. पाटील आणि औंधकर यांनी मरळनाथपूर येथील या घोटाळ्याविषयी पहिल्यांदा कृषी विभागाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणा विषयी त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक झाली. याबैठकीत कृषीराज्यमंत्री खोत यांच्या गावातील कृषी योजनांच्या मध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर करण्यात आले. या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ दखल घेतली. 

मरळनाथपूर येथील 28 शेतकर्‍यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र वीज कनेक्शन नसताना हे पंप दिले गेले आहेत. रामचंद्र दादू खोत या मयत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती 30 ऑगस्ट 1990 ला मयत झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्यांच्या नावे सन 2015-16 ला अनुदान देण्यात आले आहे. संदीप शामराव खोत यांच्या नावे जमीनच नसताना देखील 1 लाख 33 हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आले आहे.  तर सुनील मारुती खोत यांना तब्बल 3 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले असताना, त्यांच्या नावे इतरांनीच अनुदान लाटण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.  

दरम्यान आजच्या बैठकीत आटपाडी येथील शेतकर्‍यांस नियम बाह्य दिलेले कृषी अनुदान, क्रीडा विभागाने विना निविदा केलेली कामे  या संदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधीत अधिकार्‍यांना धारेवर धरले.