Sat, Apr 20, 2019 18:48होमपेज › Sangli › ईदमुळे बकरी बाजारात कोट्यवधींची उलाढाल

ईदमुळे बकरी बाजारात कोट्यवधींची उलाढाल

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 7:02PMलिंगनूर : प्रवीण जगताप

बकरी ईदमुळे जिल्ह्यात बकर्‍यांच्या बाजारात मोठी तेजी आलेली यंदा पहावयास मिळाली. बकरी ईदच्या तोंडावर मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रमुख जनावर  बाजारपेठांत आणि आठवडा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

गेल्या आठवड्यापासून  सांगलीच्या पूर्व भागातील आणि कर्नाटकातील बाजारात बकर्‍यांचे दर तीस टक्केने वधारले होते. ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, डफळापूर, जत आणि कर्नाटकातील अथणी, रायबाग येथील बाजारात बकर्‍याची किंमत 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती.

श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे जनावर बाजारात बकर्‍यांना दर नसेल असा समज होता. पण तो साफ चुकीचा ठरला आहे. यंदा बकर्‍याची अपुरी आवक आणि  बकरी ईद सण यामुळे बकर्‍यांच्या दराने यंदा चांगलीच उसळी घेतली.

यंदा लहान बकर्‍यांना पंधरा हजार तर 40 ते 42 किलो वजनाच्या कुर्बानीच्या बकर्‍यास 20 ते 22 हजार रुपये दर मिळाला. सलगरे येथील सोमवारच्या आठवडा बाजारात  चाळीस किलो वजनाच्या बकर्‍यास 20 हजारांपेक्षा अधिक  दर मिळाला होता. त्यामुळे  त्या मटणाचा दर 500 रुपये किलो झाला.

बाजारात  आवक कमी असल्याने कुर्बानीच्या बकर्‍यांप्रमाणेच लहान बकर्‍यांचे दरही वधारले होते. त्यामुळे त्यांनाही पंधरा हजारांपर्यंत  दर मिळाला.  ज्यांनी  आठ ते दहा दिवस आधीच बकरे खरेदी करून ठेवले होते. त्यांना मात्र  ते  किमान दोन ते तीन हजार रुपये स्वस्त मिळाले, अशी प्रतिक्रिया  साहेबलाल तांबोळी यांनी  व्यक्त केली. 

गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी, दर अधिक

गतवर्षी बकरी ईदच्या सुमारास आवक भरपूर होती. त्यामुळे दर कमी होते. यावर्षी ढालगाव, कवठेमहांकाळ, जत, डफळापूर, अथणी येथे मालाची आवक कमी झाली.  रविवारी अथणी येथील बाजारात आलेली बकरी एका तासात विकली गेली. रायबाग ही बकर्‍यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. मात्र कमी आवकेमुळे दर 20 हजारांच्या पुढे होते. सोमवारी सलगरे बाजारात लहान बकरे 15 हजार तर मोठ्या बकर्‍यास 20 हजारांचा दर मिळाला.  कमी आवक यामुळे हे दर वाढले. 

- युसुफ खाटीक, व्यापारी आणि मटण विक्रेते ( सलगरे)