होमपेज › Sangli › दूध संघांना ४५० कोटींचा तोटा होणार?

दूध संघांना ४५० कोटींचा तोटा होणार?

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:35AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या दूध खरेदी दराच्या सक्तीमुळे राज्यातील दूध संघांना प्रतिलिटर 9.71 रुपयाचा तोटा होत आहे. त्यामुळे दूध संघांची राज्य शासनाच्या अनुदानाअभावी आर्थिक कोंडी होत आहे. या हंगामात दूध संघांना सुमारे 450 कोटी रुपयांचा तोटा होण्याची भीती राज्य दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी   व्यक्त केली आहे.

दूध उत्पादक, दूध सहकारी संस्था, दूध संघ व महासंघाच्या अडीअडचणींबाबत अध्यक्ष विनायक पाटील व उपाध्यक्ष गोपाळराव मस्के यांनी मुख्यमंत्री व ना. महादेव जानकर यांना निवेदन दिले आहे. राज्यामध्ये प्रतिदिन 2 कोटी 87 लाख लिटर दूध उत्पादित होते. त्यातील 1 कोटी 20 लाख लिटर दूध बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यापैकी 40 टक्के दूध सहकारी संस्था संकलित करतात व 60 टक्के दूध खासगी संस्था संकलित करतात. सध्या महाराष्ट्रात 80 लाख लिटर दूध शहरी भागामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे व उर्वरीत 40 लाख लिटर दूध पावडर बनविण्यासाठी वापरले जाते. पावडर तयार करत असताना सध्या दुधाच्या भुकटीला देशांतर्गत 150 रुपये प्रति किलो भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 116 रुपये प्रति किलो भाव आहे. सध्या बाजार कोसळल्यामुळे शासनाच्या 27 रुपये या दराप्रमाणे प्रति लिटर 9.71 रुपये इतका तोटा होत आहे. हा तोटा सहन करण्याची ताकद दूध संघामध्ये नसल्याने तसेच शासन दूध घेत नसल्याने बरेचसे संघ खासगी व्यापार्‍यांना दूध देत आहेत. व्यापार्‍यांनी दूध खरेदी दर प्रति लि.रु. 21 केल्याने दूध संघाची आर्थिक कोंडी झाली आहे.

शासनाने दि. 19 जून 2017 रोजी अध्यादेश काढून फॅट 3.5 व एसएनएफ 8.5 साठी 27 रुपये भाव देणे जाहीर केले व संघांना आदेश देऊन दुधाची खरेदी शासकीय दराप्रमाणे करण्याचा आग्रह धरला आहे. 

त्यामध्ये दूध विक्रीबाबत दुधाचे विक्री दर वाढवू नये, असा आग्रह धरला आहे. या परिस्थितीमुळे दूध संघाची दोन्हीकडून आर्थिक कोंडी झाली आहे. या हंगामात 450 कोटी तोटा संघांना सहन करावा लागणार आहे. 

नंदिनी कर्नाटक फेडरेशन ही संस्था 22+5 म्हैस-6.00 फॅट, 9.0 एसएनएफ या दरात कर्नाटकात खरेदी करते. महाराष्ट्रात मात्र जादा कमिशन देऊन मुंबईत विक्री करीत आहेत. त्यामुळे संघाच्या दूध विक्रीवर परिणाम होत असल्याचे विनायकराव पाटील यांनी सांगितले.