सांगली : प्रतिनिधी
दूध दर आंदोलनाची रविवारी जिल्ह्यात ठिणगी पडली. राष्ट्रीय महामार्गावर नेर्लेजवळ मुंबईला जाणारा दूध टँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला. दरम्यान, दूध दरवाढीबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय फसवा आहे. त्यामुळे सोमवार, दि. 16 पासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन आक्रमकपणे करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो लिटर दूध संकलन ठप्प राहणार आहे. सरकारने पोलिसी बळाच्या जोरावर आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.
ही बैठक सांगलीतील संघटनेच्या कार्यालयात रविवारी झाली. बैठकीला विकास देशमुख, संजय बेले, महावीर पाटील, सयाजी मोरे, संदीप राजोबा, वैभव चौगुले, भागवत जाधव, जयकुमार कोले, अभिजित पाटील उपस्थित होते. खराडे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी 16 जुलैपासून राज्यभर बेमुदत दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. यामुळे राज्य शासनाने प्रतिलिटर तीन रुपये दर वाढ दूध संघांनी द्यावी, असा निर्णय घेतला आहे; मात्र ही घोषणा फसवी आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कायम आहे.
भागवत जाधव म्हणाले, दूध स्वस्त आणि पाणी महाग अशी परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी आक्रमक आंदोलनाशिवाय पर्याय नाही. पोलिसी बळाचा वापर करून जर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तरं देऊ. संजय बेले म्हणाले, शेतकर्यांनी दूध डेअरीला न घालता दूध आंदोलन यशस्वी करावे. संदीप राजोबा म्हणाले, गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येईल. शेतकर्यांनी आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय माघार घेऊ नये.
बैठकीला संजय खोलखुंबे, भरत चौगुले, बी. आर. पाटील, अशोक खाडे, जोतिराम जाधव, सूरज पाटील, शंकर लंगोटे, शिवाजी पाटील , लखपती पाटील, संजय माळी, राजेंद्र माने, संदीप चौगुले, धनंजय चौगुले, देवेंद्र धस, राम पाटील, मानसिंग पाटील, सुदर्शन वाडकर, मनोज उपाध्ये, गुंडाभाऊ आवटी, बाबा सांदरे, मुकेश पाटील, धैर्यशील पाटील, भारत साजणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.