होमपेज › Sangli › मलईचा गोळा अन् अनुदानावर डोळा

मलईचा गोळा अन् अनुदानावर डोळा

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:01AMसांगली : विवेक दाभोळे 

राज्य शासनाने दूध खरेदीसाठी अनुदानाचा जाहीर केलेला निर्णय आणि त्यानंतर अनुदान देण्यासाठी एनएफची लादलेला निकष या पार्श्‍वभूमीवर अनुदानवाढीची मागणी होऊ लागली आहे. बहुसंख्य दुग्धव्यवसायिकांनी ‘लोण्याचा गोळा’ मटकावून आता पुन्हा अनुदानावर ‘डोळा’ ठेवला आहे. मात्र या सार्‍या खेळात दूधउत्पादकांची दूधदर वाढीची मागणी मात्र बेदखलच  होेत आहे. 

दोन महिन्यापूर्वी दूधदर वाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन झाले. त्यानंतर शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर किमान 27 रुपयांचा दर निश्‍चित केला. याबाबत दूधउत्पादकांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आता परत दोन दिवसांपूर्वी शासनाने ‘एनएनएफ’चा निकष जाहीर  केल्यानंतर  पुन्हा एकदा दूधदर आणि  खरेदीसाठीचे अनुदान याची चर्चा होऊ लागली आहे.

तर याच दरम्यान, बहुसंख्य दूध संघ पदाधिकार्‍यांतून पुन्हा एकदा अनुदानवाढीची मागणी होऊ लागली आहे.  यासाठी दूध खरेदीपासून ते बाजारात प्रक्रिया करुन विक्री करण्यापर्यंतच्या वाढत्या खर्चाकडे बोट दाखविले जात आहे. गाय दूध खरेदी तर कळीचा मुद्दा बनला आहे. गाय दूध खरेदीत प्रतिलिटर किमान सात रुपयांचा तोटा होत असल्याचे संघ पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरुन उतरण्याची भाषा दूध खरेदीदार  करत असताना दर वाढीबाबत मात्र कोणच बोलत नसल्याचे चित्र आहे. 

वास्तविक पाहता नोव्हेंबर 2017 पासून दूधदराचा प्रश्‍न चिघळू लागला आहे. त्याचवेळी  राज्य शासनाने प्रतिलिटर दुधासाठी 27 रु. दर जाहीर केला, मात्र काही कारणांनी हा दर उत्पादकाला मिळाला नाही. मध्यंतरी झालेल्या दूधदर वाढीच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुधाचा  दर 25 रू. घोषित केला.  पण डिसेंबर 2017 मध्ये राज्य शासनाने दुधाला  27.00 रु. दर जाहीर केला होता.  तो देणे देखील बंधनकारक केले होते. पण त्याचा लाभ उत्पादकाला झालाच नाही. आंदोलनानंतर 25 रू. चा  दर वाढीव दर  मान्य केला गेला याबाबत देखील संमिश्र प्रतिक्रिया आहेत.