Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Sangli › जिल्ह्यात दूध संकलन ठप्पच

जिल्ह्यात दूध संकलन ठप्पच

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी जिल्ह्यात सुरूच होते. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी दूध रस्त्यांवर ओतून सरकारचा तीव्र निषेध केला. संतप्त  उत्पादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्यांना दुधाचा अभिषेक घातला. लाखो लिटर संकलन ठप्प राहिल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प राहिली. बुधवारपासून जिल्ह्यात दुधाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. 

पश्‍चिम भागात कडकडीत बंद

आंदोलनास शिराळा, वाळवा, पलूस   या पश्‍चिम भागातील तालुक्यांत दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संघांनी आंदोलनाच्या धास्तीने संकलन केंद्रेच बंद  ठेवली. यामुळे उत्पादकांनी दुधाचे वाटप केले. काही ठिकाणी दूध रस्त्यांवर ओतून संताप व्यक्‍त केला. रेठरेधरण येथे शेतकर्‍यांनी  रस्त्यावर दूध ओतून भाजप सरकारचा धिक्कार केला. शिराळा तालुक्यात जोरदार पावसामुळे संकलन आपोआप बंद राहिले. कोकरुड, चरण, शेडगेवाडी, कांदे, मांगले येथे  स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद आंदोलन केले. वाळवा तालुक्यातील तुजारपूर, बहे, बोरगाव, साखराळे, ताकारी, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रूक, कुरळप, नेर्ले, वाळवा, गोटखिंडी, बावची, आष्टा, बागणी, शिगाव आदी परिसरातही दूध संकलन केंद्रे बंद होती. पलूस तालुक्यात नागठाणे, अंकलखोप, आंधळी, बलवडी, बांबवडे, भिलवडी, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, सुखवाडी, आमणापूर, बुर्ली, दुधोंडी, धनगाव, माळवाडी, भिलवडी स्टेशन यासह सर्वच गावांत संघांनी संकलन केले नाही. मिरज तालुक्यातील दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, नांद्रे, डिग्रज, पद्माळे,  तुंग, कर्नाळ या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकर्‍यांनी एक ठिपूसही दूध डेअरींना घातले नाही.

कडेगाव, तासगावात लाखो लिटर दूध वाया

कडेगाव, तासगाव, खानापूर या तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढली. कडेगाव  तालुक्यात  अमरापूर, चिखली,   तोंडोली,  खेराडेवांगी,  येतगाव,  नेवरी, हणमंतवडिये, कडेगाव, शाळगाव, वांगी, रायगाव यासह अनेक गावांतील  शेतकरी  रस्त्यावर  उतरले. तालुक्यातील  शेतकर्‍यांनी संकलन  केंद्राकडे  पाठ  फिरवली. तालुक्यात सुमारे दोन  लाख लिटर दुधाचे संकलन झाले नाही. आसदमध्ये काही शेतकर्‍यांना दुधाने आंघोळ घालून  फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला.तसेच मुख्य चौकात दूध ओतले. 

तासगावात आंदोलन  तीव्र झाले. सिद्धेश्वर चौक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.  मणेराजुरी,  सावळज,  गव्हाण,  येळावी, निमणी, चिंचणी, वायफळे, अंजनी, वडगाव, नागेवाडी, सावर्डे, कुमठे, नागाव, मांजर्डे, कौलगे  यासह तालुक्यातील   सर्व 69  गावांतील   लाखो  लिटरचे   संकलन   ठप्प   होते.   सहकारी, खासगी   संघ व संस्था आणि संकलकांनी दूध स्वीकारले नाही. खानापूर तालुक्यातही  भाळवणी, आळसंद, खापरगादे, सुलतानगादे, मंगरुळ, कार्वे, रेणावी, देविखिंडी, लेंगरे, बाणूरगड, घाणंद यासह प्रमुख गावांतील शेतकर्‍यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अनेक गावांत दूध स्वीकारणार्‍या गाड्या फिरकल्याही नाहीत. 

पूर्व भागातही प्रतिसाद 

पूर्वभागातही आंदोलनाची तीव्रता मोठा होती. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, आरग, बेडग, मालगाव, लिंगनूर, सलगरे, सोनी, भोसे या मुख्य गावांत शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांनी आंदोलन केले. काही शेतकर्‍यांनी दूध द्राक्षबागांवर फवारले. अनेकांनी ठिबक सिंचनामधून ऊस व भाजीपाला पिकांना दूध दिले. कवठेमहांकाळ तालुक्यात दुसर्‍या दिवशीही दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य दूध संकलन केंद्रे बंद  ठेवण्यात आली. काही ठिकाणी शाळांमध्ये  दुधाचे वाटप करण्यात आले. मळणगाव, बोरगाव, रांजणी, अलकूड, शिरढोण, देशिंग, खरशिंग, नागज, संकलन करणार्‍यांवर केंद्रावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. आज  सुमारे 75 ते 80 हजार लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले.

आटपाडी तालुक्यात दिघंची, लिंगीवरे, नेलकरंजी, खरसुंडी, घरनिकी, शेटफळे, माडगुळे, यपावाडी, पात्रेवाडी, बनपुरी  या गावात शेतकर्‍यांनी  आंदोलनात उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला.  जत  तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. कुंभारी, कोसारी, सोरडी, सनमडी, येळवी, बनाळी, डफळापूर, शेगावसह अनेक गावात  उत्पादकांनी  संकलन  केंद्राकडे  पाठ  फिरवली.यामुळे दुसर्‍या दिवशी संकलन ठप्प झाले.  येळवी- जत रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक   घातला. तसेच मुख्य चौकात  दूध  ओतून  सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आंदोलनामुळे जिल्ह्यात दुधाची हळूहळू टंचाई जाणवू लागली आहे.  सांगली, मिरज, इस्लामपूर शहरात बुधवारपासून दुधाची टंचाई होण्याची शक्यता आहे.