Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Sangli › दूध उत्पादकांचा दुसर्‍या दिवशीही उद्रेक

दूध उत्पादकांचा दुसर्‍या दिवशीही उद्रेक

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 8:36PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाला  तालुक्यात दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दूध संकलन केंद्र बंद असल्याने उत्पादकांनी दुधाचे वाटप केले. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना स्थानबध्द केले. तालुक्यातील दोन दिवसात 6  लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन ठप्प झाले. 

दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानीने केली होती. राजारामबापू दूध संघाने दूध संकलन बंद ठेवले होते. दिवसाला 2 लाख लिटर इतके दूध संकलन होते. आंदोलनामुळे संघाने दूध वाहतूकही थांबवली आहे. कोणतीही जोखीम घेणार नसल्याचे दूध संघाच्या प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.हुतात्मा दूध संघानेदेखील दूध संकलन बंद ठेवले होते. हुतात्माचे साधारण प्रतिदिन 75 हजार लिटर दूध संकलन आहे. बोर्ड मिटींगनंतरच दूध संकलनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

रेठरेधरण : रेठरेधरण येथे दूध उत्पादकांनी रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त केला. यावेळी प्रभाकर पाटील, लहू वाघमारे, विकास पाटील, संदीप माळी, सर्जेराव पाटील, पोपट जाधव उपस्थित होते. 

तुजारपूर : तुजारपूर येथे पेठ-सांगली रस्त्यावर दूध उत्पादकाकडून वाटसरू, वाहन चालकांना सुमारे 3 हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच उद्धव पाटील, माणिक पाटील, संतोष पाटील, हणमंत पाटील, ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते. मालेवाडी येथे दूध उत्पादकांनी दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्‍त केला.

कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई...

पोलिसांनी भास्कर विष्णू मोरे, जयवंत महिपती पाटील (दोेघे रा. तांबवे), हणमंत दत्तात्रय कुंभार, जयसिंग महादेव माने (दोघे रा. नेर्ले) आप्पासाहेब  पाटील, तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना त्यांच्या नवेखेड येथील घरी स्थानबद्ध केले आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर पोलिस बंदोबस्त...

नेर्लेनजीक दुधाचा टँकर फोडल्यानंतर  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दूध संस्थांचे टँकर पोलिस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झाले. 

कवठेमहांकाळमध्ये दूध आंदोलनास प्रतिसाद

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यात दुसर्‍या दिवशीही दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी शाळांमध्ये दुधाचे वाटप करण्यात आले. सुमारे 75 ते 80 हजार लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले. दूध दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बंदमध्ये शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. देशिंग येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दूध वाटप केले. स्वाभिमानाचे सूरज पाटील, शिवाजी पाटील, शंकर लंगोटे यांनी तालुक्यातील दूध संकलकांना निवेदन देऊन दूध बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. दुसर्‍या दिवशी काही संकलकांनी संकलन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी तिकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

उसाला, द्राक्षांनाही मिळाले दूध

लिंगनूर : वार्ताहर

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकर्‍यांनी दूध संकलन बंद ठेवून सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून शेतीला सेंद्रिय मात्रा देण्यासाठी पूर्व भागातील काही शेतकर्‍यांनी अनेक गावात ऊस आणि द्राक्षांना दूध पाजले आहे. लिंगनूर, आरग, सलगरे, बेळंकी, आरग, बेडग आणि सर्व लहान- मोठ्या गावांत आणि वाडी वस्तीवर दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. बेडग, आरग, लिंगनूरमध्ये सर्वच खासगी आणि सहकारी संस्थांचे दूध संकलन बंद ठेवले होते. काही गावात ग्रामदैवतांना अभिषेक घालून दरवाढीबाबत साकडे घालण्यात आले. तर लिंगनूर बेडग येथे दूध द्राक्षबागात फवारणी मशीन आणि काहींनी ठिबक मधून सोडले आहे. लिंगनूर भागात द्राक्ष आणि पाठोपाठ उसालाही थेट पाटात दूध ओतून चक्क ऊस आणि द्राक्षांना दूध पाजले आहे. काल सायंकाळी आणि आज सकाळी बेडग आरग आणि लिंगनूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन कायम ठेवण्यासाठी आवाहन केले. 

जत तालुक्यात तीव्रता वाढली

येळवी : वार्ताहर 

जत तालुक्यात दूध आंदोलनाची तीव्रता वाढली असून उत्पादक दूध दरवाढीकरिता  रस्त्यावर आले आहेत. सोरडी, सनमडी, येळवी, बनाळी, डफळापूर,  शेगावसह अनेक गावांत दूध उत्पादकांनी संकलन  केंद्राकडे  पाठ  फिरवली. पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प होते. दुसर्‍या दिवशी येळवी (ता.जत) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. तसेच मुख्य चौकात दूध ओतून  शासनाचा निषेध  व्यक्त  केला. उर्वरित दूध  शालेय विद्यार्थ्यांना वाटप केले.

यावेळी आंदोलनात नवज्योत संकलन केंद्राचे  लिंबाजी सोलनकर, दीपक अंकलगी, संतोष स्वामी, दीपक चव्हाण, राजू कदम, नवनाथ पवार, माऊली दूध संकलनाचे प्रवीण जगदाळे, अंकुश  गोरड, विशाल पवार यांच्यासह  दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 

कडेगाव तालुक्यात शेतकर्‍यांचा पाठिंबा

कडेगाव : वार्ताहर

तालुक्यात दुसर्‍या दिवशी दूध आंदोलनाची तीव्रता वाढली असून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर  उतरलेे आहेत. अमरापूर,  चिखली,  तोंडोली,  खेराडेवांगी,  येतगाव,  नेवरी, हणमंतवडिये, कडेगाव, शाळगाव, वांगी, रायगाव यासह अनेक गावांतील  दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दूध संकलन  केंद्राकडे  पाठ  फिरवली. यामुळे तालुक्यातील सुमारे दोन लाख लिटर दुधाचे संकलन झाले नाही. आसद (ता. कडेगाव) येथे गावातील शेतकर्‍याला दुधाने अंघोळ घालून सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच मुख्य चौक येथे पाचशे लीटर दूध मेन चौकात ओतून दिले. तसेच काही  दूध  शालेय विद्यार्थ्यांना वाटले. तालुक्यातील सोनहिरा व संपतराव देशमुख दूध संस्थांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

तासगाव तालुक्यात लाखो लिटर संकलन ठप्प

तासगाव : प्रतिनिधी

तासगाव तालुक्यात भर पावसातच दूध आंदोलन करण्यात आले. 69 गावांतील उत्पादकांनी दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. लाखो लिटरचे संकलन मंगळवारीही ठप्प होते.  तालुक्याच्या सर्व भागातील उत्पादकांनी दूध संकलकांकडे घेऊन न जाता शाळा व इतरांना  वाटप केले. दरम्यान, उत्पादकांच्या पाठिंब्यामुळे संकलन बंद झाल्याने दूध रोखण्यासाठी टँकर अडविणे व रस्त्यावर दूध ओतणे यासारखे अनुचित प्रकार कुठेही घडले नाहीत. दूध उत्पादकांचा आंदोलनाला असलेला पाठिंबा पाहून सहकारी, खासगी दूध संघ व संस्था आणि संकलकांनी आंदोलनास आपला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवले.