होमपेज › Sangli › शालेय पोषण आहारात आता दूध पावडर

शालेय पोषण आहारात आता दूध पावडर

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 8:20PM



लिंगनूर : वार्ताहर

शालेय पोषण आहार योजनेत पूरक आहार म्हणून दूध भुकटी (दूध पावडर) देण्याबाबत  शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आदेश  दिला आहे. तीन महिने प्रायोगिक तत्वावर   याचा अंमल होणार आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा 200 ग्रॅमचे पाकीट  देण्यात येणार आहे.दूध दराचा प्रश्‍न सातत्याने होता.  दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलनही केले होते. आंदोलन होण्यापूर्वीच दै. ‘पुढारी’ने दूध भुकटी आणि बेदाणे यांचा शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून समावेश करण्याची सूचना करणारी बातमी  बातमी प्रसिध्द केली होती. 

त्यानंतर शासनस्तरावर याबाबत विचार सुरू होता. अनेक शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांच्या सहमतीने या मागणीला बळ मिळाले. दि. 10 जुलैरोजी अतिरिक्‍त दुधाबाबत विधीमंडळात  निवेदन करण्यात आले होते. त्यावेळी पूरक आहारात दूध भुकटीचा समावेश केल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात कर्नाटकातील ‘क्षीर भाग्य योजने’ चा अभ्यास करून पूरक आहारात दूध भुकटीचा समावेश करावा, असा  निर्णय घेण्यात आला.दि. 19 जुलैरोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दूध आणि पशुसंवर्धन खात्यानेही त्याला संमती दिली आहे. 

आता राज्यात पहिली ते आठवीतील  विद्यार्थ्यांना  दरमहा  200 ग्रॅम वजनाचे दूध भुकटीचे एक पाकीट  देण्यात येणार आहे. एकाच दिवशी शाळेत दूध भुकटी वाटप  करायचे आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत ते वाटप करायचे आहे. त्याच दिवशी भुकटीपासून दूध कसे तयार करावे याची माहिती दिली जाणार आहे. ही भुकटी महाराष्ट्रातच तयार झाली असली पाहिजे अशी अट आहे.अंगणवाडी, बालवाडीतील मुले आणि स्तनदा मातांनासुद्धा हा आहार देणे  शक्य आहे का, याचाही अभ्यास होण्याची गरज आहे.