Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’ची पावणेदोन कोटी वसुली

‘म्हैसाळ’ची पावणेदोन कोटी वसुली

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:26PMलिंगनूर : प्रवीण जगताप

म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत  मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या चार तालुक्यांत मिळून शेतकर्‍यांनी  वीजबिलापोटी एक कोटी पंच्चाहत्तर लाखांवर वसुली दिली आहे. या मोबदल्यात सुमारे दोन टीएमसी (दोन हजार दशलक्ष घनफूट) पाणी सिंचनासाठी वितरित करण्यात आले आहे.

 जत तालुक्यात दिडशेपेक्षा अधिक क्युसेक्स क्षमतेने पाणी देण्यासह आवर्तन  सुरू आहे. चारही तालुक्यातून वीजबिलासाठी वसूल करण्यात येत असलेल्या मोहिमेत शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने म्हैसाळ योजनेच्या वीजबिलासाठी यंदा प्रथमच राबविण्यात येत असलेल्या 81 - 19 च्या फॉर्म्युल्यानुसार 19 टक्के वीजबिलाचा भार उचलण्यास शेतकरी मनाने तयार होत असल्याचे वसुलीच्या आकड्यावरून दिसून येत आहे. 

पाटबंधारे खात्याकडूनही वसुलीनुसार त्या-त्या लाभक्षेत्रात तितके क्युसेक्स पाणी मोजून देण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पाणी मोजून देण्याच्या या शिस्तबद्ध पद्धतीमुळे मिरज तालुतक्यातील काही गावांत आवर्तनाचा दुसरा टप्पा आता मे अखेरीस  मागितला जात आहे. 

ज्या गावांत पहिल्या टप्प्यात काही दिवस आवर्तन सोडून बंद केले होते. अशा गावातून पुन्हा पैसे भरून दुसर्‍या टप्प्यात पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे वीजबिलापोटीच्या वसुलीप्रमाणे त्या-त्या कालव्यातून पाणी सोडून एकंदर म्हैसाळ योजना, वितरण, वसुली व वीजबिलाची रक्कम गोळा करण्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. 
बेडग ( ता. मिरज ) येथून दुसर्‍या टप्प्यात पाणी सोडण्यासाठी पुन्हा पैसे गोळा करून शेतकरी उत्स्फूर्त वसुली देऊ लागले आहेत. 

दोन महिन्यातील वसुली 

मिरज तालुका : एक कोटी नऊ लाख बावन्न हजार रूपये. कवठेमहांकाळ : तीस लाख शहाण्णऊ हजार. तासगाव  : सतरा लाख पंच्चाहत्तर हजार.जत  : सतरा लाख नऊ हजार. 

पाण्याचे झालेले वितरण

मिरज तालुका : 1051.71 दशलक्ष घनफूट. कवठेमहांकाळ  : 399 दशलक्ष घनफूट, तासगाव : 196 दशलक्ष घनफूट. जत  : 256 दशलक्ष घनफूट.

योजनेचे 75 ते 78 पंप सुरू

म्हैसाळ   योजनेचे      पाचव्या टप्प्यातील 75 ते 78 पंप  सुरू आहेत. यंदा सर्वाधिक 78 पंप सुरु झाले. त्यामुळे कालव्यातून जोरात पाणी वाहते आहे. जतलाही पाणी देणे शक्य होत आहे. उन्हाच्या तडाख्याने तलाव, बंधारे भरण्यास मात्र वेळ लागत आहे. पाण्याची पैसे भरून मागणी करणारी गावे व क्षेत्रे वाढत आहेत. त्याचा ताण वितरणाच्या नियोजनावर आहे.