Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Sangli › जत तालुक्यात म्हैसाळ योजनेची कामे गतीने

जत तालुक्यात म्हैसाळ योजनेची कामे गतीने

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 8:43PMयेळवी : विजय रुपनर  

जत तालुक्यात सध्या म्हैसाळ योजनेच्या मुख्य आणि पोटकालव्यांची कामे  सुरू आहेत.  त्यामुळे  शेतकर्‍यांना म्हैसाळ योजनेचे पाणी नजिकच्या काळात तरी येईल, अशी आशा  आहे. 

म्हैसाळ  योजनेचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये  केल्याने सध्या निधी उपलब्ध झाला आहे. कालव्यांचे काम  डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  वंचित असणार्‍या गावांचाही समावेश करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. म्हैसाळ उपविभाग कालवा जत मधील 53 ते 81 या टप्प्यामधील कामे  सुरू आहेत.  मातीकाम, बांधकाम, अस्तरीकरण  आणि भरावाचे काम यांचा त्यामध्ये समावेश आहे. तीन जलसेतू बांधण्याचा प्रस्ताव आहे. ताकारी -म्हैसाळ  योजनेतून जत तालुक्यातील सुमारे 34 हजार 811 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुख्य कालव्यास  सनमडी  हद्दीबाबत (2430 मीटर  लांबीवर) शेतकर्‍यांनी विरोध दर्शविल्याने ते काम प्रलंबित होते.  ते   सुरू झाले.  

येळवी भागात पाण्याची प्रतीक्षा

बनाळी- शेगाव वितरिका क्रमांक 2 चे वितरण व्यवस्था, सनमडी लघुवितरिका, मायथळ, आबाचीवाडी, उमदी  वितरिका, जाडरबोबलाद वितरिका (क्रमांक 1 व 2) या कामांसाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. संंरेखा प्रस्ताव तयार असून त्याकरिता अंतिम मंजुरी लवकरच अपेक्षित आहे. यातून येळवी, बनाळी, घोलेश्वर, काराजनगी, टोणेवाडी, कोणीकोणूर, आबाचीवाडी, सनमडी, मायथळ, व्हसपेठ, खैराव, माडग्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, निगडी बुद्रूक   गावांना लाभ होणार आहे. सांगोला वितरिका क्रमांक 1 मुळेही येळवी व वायफळ येथील 351 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

वंचित गावांसाठी हालचाली

आराखड्यात समावेश नाही. मात्र जिथे  पाणी पोहोचणे शक्य आहे, त्या गावांचाही योजनेत  समावेश करण्याकरिता खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप आणि  बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे  प्रयत्न करीत आहेत. मुंबईत जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांची या नेत्यांसह एका शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. त्यांनी लवकरच  याबाबत अधिकार्‍यांची बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे.  दरम्यान, यामुळे दुष्काळग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.