होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’ योजनेच्या आशेवरही ‘पाणी’

‘म्हैसाळ’ योजनेच्या आशेवरही ‘पाणी’

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 8:51PMकवठेमहांकाळ : गोपाळ पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन लोंबकळत पडल्यामुळे शेतकर्‍यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. जुनी वादातील थकबाकी, नव्या आवर्तनाच्या पाणीपट्टी वसुलीतील राजकारण यामुळे म्हैसाळचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्याचवेळी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. कधी पैशांची जुळवाजुळव करा, टंचाईतून भरा, शेतकर्‍यांनी पाणीपट्टी राहिली, वीज बिलाची रक्कम भरावी, जुन्या थकबाकीचे काय? अशा चर्चा सुरू आहेत. 
त्यामध्ये राजकारण, मोर्चे, रास्तारोको, शेतकरी, अधिकारी, मंत्र्यांसोबत बैठका हे सर्व सत्र चालू आहे. हे सर्व होतानाही, म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी काहीच सकारात्मकता दिसत नव्हती. त्यानंतर कवठेमहांकाळ येथे भाजपच्यावतीने शेतकरी मेळावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यामुळे म्हैसाळच्या आशा पल्लवीत झाल्या.

म्हैसाळ योजनेच्या वीज बिलाची रक्कम भरण्याची तरतूद करण्यात आल्याचे आणि दोन दिवसांत योजना सुरू केली जाणार, अशी शक्यता वर्तवली गेली. जुन्या पाणीपट्टीची रक्कम माफ करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आणि नव्याने पाणीपट्टी भरण्यासाठी 19:81 च्या फॉर्म्युल्यानुसार आकारणी होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. 

त्यामुळे आता जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वभाग आणि तासगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.