आरग : वार्ताहर
म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची गळती काढण्याचे काम गतीने सुरू आहे. 600 मायक्रॉनचा प्लास्टिक कागद वापरून गळती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आरग (ता. मिरज) येथे असणार्या टप्पा क्रमांक 3 व 4 च्या दरम्यान असणारी गळती 80 टक्के बंद होणार आहे. त्यामुळे वाया जाणारे पाणी बंद होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी असणारी गळती याच पध्दतीने काढण्यात येणार आहे.
म्हैसाळ प्रकल्पाचे आवर्तन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणची गळती काढण्यात येत आहे. या ठिकाणी मोठी गळती लागली होती. गळतीमधून वाया जाणारे पाणी ओढापात्रातून कर्नाटक हद्दीपर्यंत पोहोचत होते. गळतीचा लाभ घेणारे मात्र या वर्षीच्या गळतीमधून मिळणार्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. या पाण्याची पाणीपट्टी वसुली होत नव्हती. थकबाकी पाणीपट्टी वसुलीसाठी अधिकार्यांना बांधापर्यंत जाऊन देखील अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे वसुलीला मर्यादा पडल्या होत्या.
सध्या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची गळती काढण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण कालव्याला असणारी गळती या नवीन पध्दतीने काढण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे थांबणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी योग्य प्रमाणात वापरण्यासाठी प्रयत्न होणार असून मागणीनुसारच पोट कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभाग करणार आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे आवर्तन सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.