होमपेज › Sangli › म्हैसाळ योजनेची वसुली थंड, पाणी पुरवठा बंद

म्हैसाळ योजनेची वसुली थंड, पाणी पुरवठा बंद

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 10:15PMलिंगनूर : प्रवीण जगताप

जिल्ह्यातील चार तालुक्यांकरीता महत्त्वाची असलेल्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सध्या वसुलीअभावी बंद   आहे. योजनेच्या वसुलीम मोहिमेस 22 जानेवारीपासून सुरुवात झाली असून वीस दिवसांत अगदी नगण्य वसुली झाली आहे. म्हैसाळ योजना थकबाकीत चांगलीच अडकली  आहे. 

म्हैसाळ योजनेचे आजअखेरचे एकूण वीजबिल 34.66 कोटी इतके आहे. यापैकी किमान पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय आवर्तन सुरू होणार नाही, असे आदेश दिले आहेत. 34.66 कोटी थकीत वीज बिलापैकी सुमारे 17.30 कोटी वीजबिल भरावे लागणार आहे. यापैकी टंचाई निधीतून शासनाने दोन महिन्यापूर्वीच साडेपाच कोटींचे वीजबिल मंजूर केले आहे. त्यामुळे आता 12.10 कोटी वीजबिल भरल्याशिवाय यंदाचे उन्हाळी आवर्तन सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

वसुलीस अत्यंत थंडा प्रतिसाद आहे. शेतकर्‍यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नाही. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याकरीता 12 कोटींची वसुली आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील गावांत 25 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी चार ते पाच गावांचे क्षेत्र वाटून दिले आहे. हे अधिकारी रोज त्या गावात वसुलीकरीता थांबून पदाधिकार्‍यांना संपर्क करून प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक गावांत बैठकीस केवळ दहा ते पंधरा जणांची उपस्थिती मिळत आहे. 22 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत केवळ तीन लाख रुपयांपर्यंतच नगण्य वसुली झाली आहे, अशी माहिती योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे व सहाय्यक अभियंता यळगुडे यांनी दिली. 

पाणी वापर संस्थेच्या मतदार याद्या तयार

दरम्यान, शासनाच्या धोरणानुसार योजनेच्या कालव्यांवर स्थापन करावयाच्या पाणी वापर संस्थांच्या संभाव्य मतदार याद्या तयार झाल्या आहेत. त्या हरकतींकरीता प्रसिध्द करूनही लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळेच   हरकतीच आल्या नाहीत. यातून मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे वसुलीअभावी आवर्तन लांबत आहे. तर दुसरीकडे त्यावर नियंत्रण ठेऊ शकणार्‍या पाणी वापर संस्थांच्या संचालक निवडीच्या प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचीही माहिती मिळाली.