Fri, Apr 26, 2019 04:00होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’चा तिढा १७ कोटींचा

‘म्हैसाळ’चा तिढा १७ कोटींचा

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 05 2018 8:16PMसांगली : विवेक दाभोळे

मिरज पूर्व भागासाठी वरदान ठरलेल्या ‘म्हैसाळ’च्या या हंगामातील पहिल्याच आवर्तनाला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. वीजबिलाची थकबाकी साडेसतरा कोटींच्या घरात पोहोचली आहे. याच दरम्यान वसुलीस मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. जेमतेम सहा लाख रुपयांच्या घरात वसुली झाली आहे. अर्थात जरी सरकारने साडेपाच कोटी  दिले तरी उर्वरित रकमेचे काय, या प्रश्‍नाच्या उत्तरावरच ‘म्हैसाळ’च्या आवर्तनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

प्रामुख्याने मिरजपूर्व भागात ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा भरोसा ठेवत अलीकडील तीन- चार वर्षांपासून या सार्‍या भागात द्राक्ष, भाजीपाला तसेच अनेक ठिकाणी उसासारख्या पिकांकडे शेतकरी वळला आहे. मात्र गेल्या दोन- तीन महिन्यांपासून या सार्‍या भागात टंचाईसदृश्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे.  अनेक तलाव, विहिरी, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे.  मात्र ‘म्हैसाळ’चे आवर्तनच सुरू न झाल्याने या सार्‍या पिकांची होरपळ सुरू झाली आहे. भाजीपाला पिकांना तर या भागात फार मोठा फटका बसू लागला आहे. आता तर उन्हाळ्याची सुरूवात होत आहे. एव्हाना एखादे आवर्तन होणे गरजेचे होते. अर्थात याचवेळी पाणीपट्टी वसुलीस देखील अल्प प्रतिसाद मिळत आहे. 

आवर्तनला राजकारणाचे ‘ग्रहण’

गेल्या हंगामात पहिले आवर्तन सुरू होण्याच्यावेळी देखील पाणीपट्टी वसुलीत अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होताच. तसेच वीजबिलाची थकबाकी कशी भरली जाणार, हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र तोेंडावर जिल्हा परिषद, पंचायत समितींची निवडणूक होती, त्यामुळे शासनकर्त्यांनी  ‘टंचाई’तूनच निधीची तरतूद केली होती. आता तरतूद का केली जात नाही, हा देखील सवाल होत आहे. तसेच  या योजनेच्या आवर्तनाभोवती पूर्वभागाचे राजकारण फिरू लागले आहे. 

परराज्यातील कारखान्यांमुळे फटका..

‘म्हैसाळ’च्या पाण्यावर पिकलेला ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील अनेक कारखाने नेतात. त्यांच्याकडून वसुलीस मात्र सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.  पाटबंधारे विभाग त्यांच्यावर सक्ती देखील करू शकत नाही. सन 2015 मध्ये या भागातील कारखान्यांनी वसुलीसाठी मोठा निधी देऊन महत्वाचे योगदान दिले होते, मात्र त्यांनाच या भागातील ऊस कमी मिळू लागल्याने या कारखान्यांनी देखील आता हात आखडता घेतला आहे. 

..तर आवर्तन होईल ‘दिवास्वप्न’च!

कोणी किती काही म्हटले तरी वसुली चांगली झाल्याखेरीज ‘म्हैसाळ’च्या कालव्यात पाणी पडणार नाही  हे निश्‍चित!  तरी देखील वसुलीस अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. सन 2015-16 मध्ये मात्र अधिकार्‍यांनी आणि शेतकर्‍यांनी देखील एकदिलाने वसुलीची मोहीम राबविली.  त्यावेळी सर्वधिक म्हणजे तब्बल साडेआठ कोटी रुपयांची वसुली झाली होती. साखर कारखान्यांनी देखील यात साडेसहा कोटी भरले होते. मात्र यावेळी चित्र उलटे आहे. ‘म्हैसाळ’च्या पाण्यावर पिकलेला ऊस मोठ्या प्रमाणात सीमेवरील कारखाने नेतात, त्यामुळे त्यांच्याकडून वसुलीस सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. तर भागातील कारखाने ऊस मिळत नाही म्हणून आता वसुलीसाठी ‘हात’ पुढे करण्यास उत्सुक नाहीत, साहजिकच या कोंडीत आता शेतकर्‍यांनीच ऊस कोणाला द्यायचा, हे आधीच ठरवून वसुलीस प्रतिसाद दिला तरच ठीक अन्यथा या भागासाठी  ‘म्हैसाळ’चे आवर्तन दिवास्वप्न राहण्याची भीती अधिक आहे.