Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Sangli › डोळ्यांत चटणी टाकून अडीच लाखांची लूट

डोळ्यांत चटणी टाकून अडीच लाखांची लूट

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:56PMआटपाडी : प्रतिनिधी

उत्तरप्रदेशातील डाळिंब व्यापार्‍याच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून अडीच लाखांना लुटण्याचा प्रकार येथे झाला आहे. त्याचे एटीएम हस्तगत करुन  त्याच्याच कामगाराने साथीदारांच्या मदतीने रकमेवर डल्ला मारला आहे.व्यापार्‍याने व्यक्त केलेल्या  संशयावरुन पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत  मुख्य संशयिताला अटक केली आहे.  त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. 

डाळिंबांचा व्यापारी संजयकुमार सुभाषचंद्र द्विवेदी (वय 32, रा. बसभरिया. ता. कर्णेलगंज,  जि. गोंडा, उत्तरप्रदेश) हे गेल्या दहा वर्षापासून  येथे डाळिंबाचा व्यापार करतात. ते पोलिस स्टेशनच्या रेणुका निवासजवळ राजू इनामदार यांच्या घरात राहतात. बुधवारी रात्री 12 च्या सुमारास त्यांना कोणीतरी हाक मारुन उठविले आणि दार उघडताच अंधाराचा फायदा घेत त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली.

त्यानंतर दोघांनी घरात प्रवेश करुन धमकावून त्या  व्यापार्‍याचा मोबाईल व रोख 12 हजार व पैशाचे पाकिट लंपास केले. त्यानंतर एटीएमचा पासवर्ड माहीत असल्याने या दोघांनी व्यापार्‍याचे एटीएम कार्ड वापरुन 2 लाख 40हजार लंपास केले.

एटीएम कार्ड लंपास झाल्याने तासाभरातच द्विवेदी यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली. परंतु त्यांना थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या खात्यावरून पैसे काढून घेतले गेल्याचे सांगण्यात आले. दार  उघडण्यासाठी कामगारानेच हाक मारल्याचा अंदाज असल्याने व एटीएमचा पासवर्ड त्याला माहीत असल्याने व्यापार्‍याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करुन माडगुळे येथून संशयित किरण झोडगे  व त्याच्या साथीदाराला अटक केली. पोलिसांकडून लंपास केलेल्या रकमेचा तपास सुरू आहे. या घटनेची पोलिसांत नोंद आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.व्ही.वाघ करीत आहेत.