Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Sangli › व्यापार्‍याला गंडा घालण्याचा प्रकार हाणून पाडला

व्यापार्‍याला गंडा घालण्याचा प्रकार हाणून पाडला

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

मध्यप्रदेश येथील बटाटा व्यापार्‍याला तीन लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कडक पवित्र्यामुळे हाणून पडला. फळे व भाजीपाला मार्केटमधील संबंधित अडत्याने व्यापार्‍याला दीड लाख रुपये रोख व एक लाखाचा धनादेश दिला आहे. उर्वरीत 47 हजार रुपयांचा वादही तातडीने मिटवण्याचे आदेश बाजार समितीने दिले आहेत. 

मध्यप्रदेश येथील व्यापार्‍याने सांगलीत विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील एका अडत्याकडे बटाटा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे बिल मिळावे यासाठी त्याने सांगलीत यापूर्वी तीनदा हेलपाटे मारले होते. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर त्या व्यापार्‍याने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली. 

समितीचे सभापती दिनकर पाटील, फळे व भाजीपाला मार्केटचे सभापती दीपक शिंदे, मिरज दुय्यम बाजार आवारचे सभापती वसंतराव गायकवाड व संचालकांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. संबंधित अडत दुकानदाराला   चौकशीसाठी बोलावण्यात आले. अडत्याच्या मुलाने मध्यप्रदेशच्या  व्यापार्‍याचे काहीच देणे लागत नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावर सभापती पाटील यांनी त्याची उलटतपासणी घेतली. खरेदीदार व्यापार्‍याला गंडा घालण्याचा प्रकार गंभीर असून दोषी अडत्याचे दुकान सील करण्याचे आदेश दिले. दुकान सील होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यांनी हस्तक्षेप केला. मात्र बाजार समितीने कडक पवित्रा घेतला.