Fri, Jul 19, 2019 18:47होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेत उद्या ‘मेमोरीडिंग’

जिल्हा परिषदेत उद्या ‘मेमोरीडिंग’

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 10:08PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सन 2016-17 च्या तपासणीतून निदर्शनास आलेल्या त्रुटी, आक्षेपांवर दि. 4 जुलै रोजी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर जिल्हा परिषदेत ‘मेमोरीडिंग’ घेणार आहे. जिल्हा परिषदेत त्याची जोरात तयारी सुरू आहे. ‘झिरो पेन्डन्सी’ वरील धूळही झटकली जात आहे. 

पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर ‘मेमोरीडिंग’साठी बुधवारी जिल्हा परिषदेला भेट देणार आहेत. सहायक आयुक्त चंद्रकांत गुडेवार, श्री. लागोर  हेही समवेत असणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांकडील आस्थापना, योजनांच्या  अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दरवर्षी तपासणी होत असते. भरती, बदली, पदोन्नती, आरक्षण, सेवाविषयक लाभ तसेच विविध विभागांकडून राबविण्यात येणार्‍या योजनांच्या अंमलबजावणीबाबत तपासणी होत असते. 

सन 2016-17 मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून झालेल्या तपासणीत 160 मुद्दे उपस्थित झाले होते. त्यावरील कार्यवाहीची माहिती जिल्हा परिषदेने आयुक्त कार्यालयाला सादर केलेली आहे. 160 पैकी 36 मुद्यांवर विभागीय आयुक्त म्हैसेकर जिल्हा परिषदेत ‘मेमोरिडींग’ घेणार आहेत. अपहार प्रकरणांची माहितीही आयुक्तांकडून घेतली जाईल. ‘मेमोरिडींग’वेळी झाडाझडती होऊ नये यासाठी कसून ‘नेट प्रॅक्टीस’ सुरू आहे.