Tue, Jan 22, 2019 12:04होमपेज › Sangli › मराठा क्रांती मोर्चाची आज सांगलीत बैठक 

मराठा क्रांती मोर्चाची आज सांगलीत बैठक 

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:13AMसांगली : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची  राज्यस्तरीय बैठक रविवार, दि. 17 रोजी सांगलीत भारती हॉस्पिटल येथे होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची रणनीती या बैठकीत निश्‍चित होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील यांनी दिली. 

डॉ. पाटील म्हणाले, मुंबईत दि. 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती महामोर्चा झाला. मराठा आरक्षणासह, मराठा युवक, युवतींना शिक्षणात सवलती, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक व अन्य आश्‍वासने शासनाने दिली होती. या सर्व आश्‍वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहेे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची यापुढील वाटचाल, आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची रणनिती व नव्याने समाज   बांधणीसाठी   या बैठकीत ठोस निर्णय होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक सांगलीतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला गुणात्मक पुरावे सादर केले जाणार आहेत. त्यासाठीचे कागदोपत्री पुरावे गोळा केले जात आहेत. संयोजन प्रशांत भोसले, संजय देसाई, किरण पाटील, सतीश साखळकर, संभाजी पोळ, योगेश पाटील, अजय देशमुख, महेश घार्गे, संदीप राऊत, धनंजय वाघ, विलास देसाई, अमृतराव सूर्यवंशी, आर. जे. पाटील, चंद्रकांत पाटील, श्रीरंग पाटील, राहुल पाटील, राहुल जाधव, नितीन चव्हाण, प्रशांत पवार, प्रवीण नांदवलेकर, अमोल बोराडे, अविनाश बागल, अमृत पवार, रवी खराडे, शिवाजी मोहिते, धनंजय पाटील, रणजीत जाधव, विश्‍वजीत पाटील व कार्यकर्ते करीत आहेत.