Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Sangli › सांगली येथे मेमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक

सांगली येथे मेमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मेच्या दुसर्‍या आठवड्यात सांगलीत होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यासह  राज्य आणि केंद्रातील अनेक मंत्री, राज्यातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी सांगलीत येणार आहेत. वास्तविक महापालिका निवडणूक जूनअखेर होत असून, त्याचे बिगुल वाजले आहे. भाजपने मिशन महापालिका टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने वातावरण निर्मितीसोबतच भाजप महापालिकेसाठी ताकदही लावणार, हे उघड आहे. 

जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपचा बोलबाला आहे. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या इनकमिंगवर हा डोलारा असला तरी गेल्या चार वर्षांत भाजपने जिल्ह्यात मोठी बांधणी केली आहे. खासदार, चार आमदारांबरोबरच याच जोरावर  जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सर्वाधिक ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्या आहेत. आता भाजपचे सांगली, मिरज आणि महापालिका टार्गेट आहे. येत्या जूनअखेर महापालिका निवडणूक असल्याने त्यासंदर्भात मोर्चेबांधणीही सुरू आहे. या महापालिका निवडणुकीवर पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे भाजपने पूर्ण ताकदीने महापालिका जिंकण्याची तयारी केली आहे. त्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारली आहे.

त्याच पार्श्‍वभूमीवर भाजपने आता राज्य कार्यकारिणीची बैठक सांगलीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 12 मे रोजी आहे. त्यामुळे त्यानंतरचा मुहूर्त भाजपने काढला आहे. येत्या 15 मेनंतर ही बैठक होणार आहे. अमित शहा आणि फडणवीस यांच्या वेळ निश्‍चिती व्हायची आहे. त्यामुळे अद्याप तारीख निश्‍चित झालेली नाही. या बैठकीसाठी सुसज्ज जागा आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थळ निश्‍चिती आणि नियोजनासाठी दोन दिवसांत भाजपच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यामुळे आता भाजपची ही राज्यस्तरीय बैठक महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निमित्ताने सांगलीत शक्‍तिप्रदर्शनच होणार आहे. 

Tags : sangli, BJP State Executive,Meeting, May, sangli news,