Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Sangli › महापौरपदाचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात

महापौरपदाचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत भाजपची सत्ता प्रथमच स्थापन झाली आहे. त्यामुळे  पहिला महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, या पदाच्या उमेदवारीचा निर्णय आता पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे  सोपविण्यात आला आहे. 

हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यासाठी सात नगरसेविका  इच्छुक आहेत. सोमवारी  भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत  नावांबाबत चर्चा झाली. त्यातून चारजणींची नावे निश्‍चित करून प्रदेश कार्यकारिणीकडे शिफारस करण्यात आली आहे. 

बुधवारी ना. देशमुख ध्वजवंदन कार्यक्रमासाठी सांगलीत येणार आहेत. त्यावेळी नगरसेवकांची बैठक घेऊन  शिक्कामोर्तब होणार आहे.  गुरुवारी (दि. 16) अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांचा अर्ज दाखल होईल. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडूनही उमेदवारीबाबत हालचाली सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव करुन पहिल्यांदाच भाजप महापालिका सत्तेत आली आहे. महापालिका स्थापनेपासून 20 वर्षांत पहिल्यांदाच सत्तांतर झाले आहे. भाजपच्या सत्तेत होणारी पहिलीच महापौर निवड दि. 20 ऑगस्टरोजी दुपारी 11.30 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

ओबीसी महिला प्रवर्गातून महापौरपदासाठी सौ. संगीता खोत, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, सविता मदने, गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यादृष्टीने त्यांनी नेत्यांकडे तशी मागणीही केली. 

दरम्यान, ना. चंद्रकांत पाटील यांनी महापौर, उपमहापौरपदसह सर्वच पदांच्या निवडीचे सर्वाधिकार सांगलीतील कोअर कमिटीला दिले आहेत. त्यामुळे आज उमेदवारीसंदर्भात कोअर कमिटीची बैठक झाली. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, सुरेश आवटी, मुन्ना कुरणे आदी उपस्थित होते. आमदार सुरेश खाडे, उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थितांनी चर्चा केली, पण निर्णय घेतला नाही.

चर्चेत सांगली, मिरज, की कुपवाडला संधी द्यायची. कसा समतोल सांभाळायचा असे बरेच मुद्दे पुढे आले. त्यानंतर सौ. खोत, कल्पना कोळेकर, सविता मदने, अनारकली कुरणे या चौघींची नावे पुढे आल्याचे सांगण्यात आले. या चौघींपैकी एकीला उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश कार्यकारिणीकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदेशकडून याबाबत सूचना येतील. शिवाय बुधवारी सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत कोअर कमिटी आणि नगरसेवकांची बैठक होईल. या बैठकीत महापौरपदाबरोबरच उपमहापौरपदाच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ताकदीने महापौर-उपमहापौर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे स्वाभिमानीसह संख्याबळ 36 आहे. काँग्रेस महापौरपदासाठी आणि राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे करणार आहेत.  सौ. वर्षा निंबाळकर, वहिदा नायकवडी, बबिता मेंढे यांच्यासह अनेकजणी महापौरपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आघाडीचाही गुरुवारीच चर्चेने निर्णय होणार आहे. 

भाजपकडून शहरनिहाय पदेवाटप होणार

पहिल्यांदाच होणारा भाजपचा महापौर सांगलीचाच असावा, असे मत पुढे येत आहे. परंतु त्यावर एकमत झालेले नाही. सांगलीला महापौरपद दिल्यास मिरजेला स्थायी समिती सभापती, तर उपमहापौरपद कुपवाडला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवारीनुसार बर्‍याचजणांची संधी अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने अन्य पदांसाठी इच्छुकांचेही महापौरपदाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.