Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Sangli › महापौरांची निवड 20 ऑगस्टला

महापौरांची निवड 20 ऑगस्टला

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी

महापौर निवडीचा दि. 20 ऑगस्टचा मुहूर्त निघाला आहे. महापालिका प्रशासनाने दि.18 ऑगस्टची मुदत कळविली होती. पण  विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर निवडीसाठी दि. 18 ऐवजी दि. 20 ऑगस्टरोजी सकाळी 11.30 वाजता ही निवड सभा होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. यासाठी दि. 16 ऑगस्टरोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 

महापालिकेत प्रथमच सत्तांतर होऊन भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे.  भाजपचे संख्याबळ 41 होते. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ 42 वर गेले आहे. 
काँग्रेस-राष्ट्रवादीचे 35 सदस्य आहेत. स्वाभिमानी विकास आघाडी आणि एक अपक्ष  असे दोन सदस्य आहेत.  आता भाजपच्यावतीने पहिल्याच महापौरांची निवड होणार आहे. महापौरपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी (ओबीसी महिला) राखीव आहे. 

मनपाचे नगरसचिव  के. सी. हळिंगळे   महापौर निवडीसंदर्भातील प्रस्ताव घेऊन विभागीय कार्यालयात गेले होते. डॉ. म्हैसेकर यांनी महापौर निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देत दि. 20 ऑगस्ट हा  दिवस निश्‍चित केला. एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर दि. 20 ऑगस्टरोजी अर्ज माघारीसाठी सभेत मुदत देण्यात येईल.  भाजपतर्फे महापौरपदासाठी सौ. संगीता खोत, अनारकली कुरणे, गीता सुतार, सविता मदने, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सरगर, नसिमा नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येकजणींनी समर्थनासाठी व्यूहरचना केली आहे. 

कोणाला संधी द्यायची यासाठी बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी नगरसेवकांची सांगलीत बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा पदाधिकारी निवडीसंदर्भात मिरजेत पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर आदी कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.  परंतु नावाबाबत निर्णय झाला नसल्याचे समजते.  काँग्रेस-राष्ट्रवादीचे 35 व स्वाभिमानी 1 असे एकूण 36 संख्याबळ होते. त्यामुळे भाजपमध्ये  बंडखोरी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यातून संधी मिळू शकते. वेगळ्या खेळी होऊ शकतात.   

महापौरांसह सर्व निवडीसाठी कोअर कमिटी सक्षम

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण कोणाला संधी द्यायची याचा निर्णय कोअर कमिटी घेईल. महापौर, गटनेते, स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवकांसह सर्वच निवडीचे अधिकार कोअर कमिटीला दिलेले आहेत. कमिटी सक्षम आहे.  महापालिकेच्या कारभारावर  फक्‍त आमचा कंट्रोल राहील.