Mon, May 20, 2019 10:26होमपेज › Sangli › भाजपची सत्तेची दिवास्वप्ने धुळीस मिळवू

भाजपची सत्तेची दिवास्वप्ने धुळीस मिळवू

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:30PM
सांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फेच लढवली जाणार  असल्याचे  महापौर हारुण शिकलगार यांनी सांगितले. यासंदर्भात काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम, डॉ. जयश्री पाटील यांची सकारात्मक भूमिका आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनीही होकार दर्शवला आहे. फोडाफोडीचे राजकारण करून महापालिकेची सत्ता बळकावू पाहणार्‍या भाजपची सत्तेची दिवास्वप्ने धुळीस मिळविण्यासाठी आघाडी गरजेची आहे  असे ते  म्हणाले.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यासह राज्यात मोदी लाटेच्या नावे भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीत फोडाफोडी करूनच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळविले होते. त्यानंतरही जिल्हा परिषद, पंचायत समिती  निवडणुकाही तशाच जिंकल्या. मात्र, ग्रामपंचायत  निवडणुकीत  त्यांना यश मिळाले नाही.

शिकलगार म्हणाले, महापालिकेत काँग्रेस सत्तेत तर राष्ट्रवादी विरोधक आहे. भाजपचे संख्याबळ नगण्य आहे. असे असतानाही आता भाजपने पुन्हा बाजार मांडून काँग्रेस-राष्ट्रवादीतून सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु त्यांनीच केलेल्या सर्व्हेक्षणातून भाजप दोनअंकी संख्येपर्यंतही पोहोचणार  नसल्याचे उघड आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात सत्तेचा गोळा पळविण्यासाठी टपलेल्या भाजपला धडा शिकविणे गरजेचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते,कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांचाही तोच सूर आहे. 

ते म्हणाले,  गोरगरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, व्यापारी सर्वच जण भाजपवर नाराज आहेत. ते निवडणुकीची वाटच पाहत आहेत. त्यामुळे भाजपचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे.  महापालिका निवडणुकीतही त्यांच्या भ्रमाचा फुगा फुटेल. 

शिकलगार म्हणाले, राज्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार आहे. तेथे आघाडी निश्‍चित होईल. त्यानुसार लवकरच सांगलीतही नेत्यांची बैठक घडवून आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढाकार घेऊ. त्याआधारे महापालिका निवडणूक आघाडीतूनच आम्ही जिंकू.