Thu, Apr 25, 2019 11:38होमपेज › Sangli › ईव्हीएमद्वारे पालकमंत्री आणणार भाजपच्या ६० जागा

ईव्हीएमद्वारे पालकमंत्री आणणार भाजपच्या ६० जागा

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:32PMसांगली : प्रतिनिधी

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला साठ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यांनी हे भाकीत ईव्हीएम मशीनच्या आधारे केले आहे. साठ जागांसाठी त्यांनी ईव्हीएम मशीन सेट केले  आहे काय, असा टोला महापौर हारुण शिकलगार यांनी पत्रकार बैठकीत लगावला.  

ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका पारदर्शीपणे पार पडण्यासाठी ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट मशीन बसविण्याची गरज आहे. सोमवारी (दि. 21) आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांकडे तशी मागणी करणार आहे.

शिकलगार म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली तर फायदेशीरच आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र दोन्ही पक्षांची आघाडी व्हावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मनपाच्या प्रभाग क्रमांक दोन, तीन, आठ, तेरा, सतरा, अठरा, एकोणीस व वीस या प्रभागात आघाडी फायदेशीर आहे.

ते म्हणाले,  सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांसाठी उभारलेल्या 70 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे रविवारी (दि. 27 मे)  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 4.30 वाजता तेथे सभा होणार आहे. 

ते म्हणाले, सांगली व कुपवाडमधील सन 2040 मध्ये अंदाजे सात लाखांवर लोकसंख्या जाणार आहे. ती गृहित धरून माळबंगला येथे अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतून माळ बंगला येथे दुरूस्तीसह 56 एमएलडी व नव्याने 70 एमएलडी जलशुध्दिकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातील 56 एमएलडीचे लोकार्पण पूर्वीच काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्याहस्ते झाले होते. आता 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.  या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी होणार होईल. या मेळाव्यात काँग्रेसचे इच्छुक शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.