होमपेज › Sangli › महापौर, उपमहापौरपदाचा आज होणार फैसला

महापौर, उपमहापौरपदाचा आज होणार फैसला

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 12:38AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचा सोमवारी (दि. 20) फैसला होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून संगीता खोत, सविता मदने तर काँग्रेसकडून वर्षा अमर निंबाळकर मैदानात आहेत. उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी, पांडुरंग कोरे यांच्यापैकी एक व राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी यांच्यात लढत होणार आहे. बहुमतात असलेल्या भाजपने आपल्या 42 सदस्यांना गोवा सहलीला पाठविले आहे. ते तेथून थेट मतदानासाठी दाखल होणार आहेत. महापौरपदी खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते. सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी 11.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत निवड सभेत याचा फैसला होणार आहे. 

महापालिकेत सत्तांतरानंतर भाजप पहिलीच महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढवत आहे. महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपचे 78 पैकी 42, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 35 सदस्य आहेत. स्वाभिमानी विकास आघाडीचे विजय घाडगे एकमेव सदस्य आहेत. त्यानुसार महापौरपदासाठी भाजपकडून संगीता खोत, अनारकली कुरणे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, कल्पना कोळेकर आदी इच्छुक होते. यापैकी सविता मदने, संगीता खोत, कल्पना कोळेकर,अनारकली कुरणे या इच्छुक होत्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर, उपमहापौरपदासह सर्व निवडीचे अधिकार भाजपाचे शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेशउपाध्यक्षा  नीता केळकर, शेखर इनामदार, दीपक शिंदे या कोअर कमिटीला दिले होते. त्यानुसार कोअर कमिटीने सौ. खोत, सौ. मदने, अनारकली कुरणे यांची नावे निश्‍चित करून यापैकी एकीला संधी द्यावी, अशी मागणी प्रदेश भाजपला कळविले होते. त्यानंतर पुन्हा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नगरसेवकांसह कोअर कमिटीची बैठक घेऊन चाचपणी केली. कोअर कमिटीसमवेत चर्चेने सौ. खोत, सौ. मदने यांची महापौरपदासाठी, तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी, पांडूरंग कोरे यांची नावे निश्‍चित केली. त्यानुसार गुरुवारी त्यांचे अर्ज दाखल झाले. 

काँग्रेसनेही शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यासह नेत्यांशी चर्चेने उमेदवार ठरविले.  महापौरपदासाठी काँग्रेसच्या वर्षा अमर निंबाळकर, तर  उपमहापौरपदासाठी स्वाती सुरेश पारधी यांचे उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही अजून चमत्काराच्या आशा आहेत. त्यामुळे आता महापौर कोणाचा आणि कोण याचा सोमवारच्या सभेत फैसला होणार आहे.