Thu, Mar 21, 2019 23:34
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › शासन निर्णयाची माथाडींकडून होळी

शासन निर्णयाची माथाडींकडून होळी

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 8:48PMसांगली : प्रतिनिधी

राज्यातील 36 माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून मुंबईत राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ सुरू करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची सांगलीत हमाल, मापाडी, महिला माथाडींनी होळी केली. मंगळवारी लाक्षणिक संप करून सांगली मार्केट यार्डात माथाडी बोर्डासमोर धरणे आंदोलन केले. माथाडी मंडळांच्या विलिनीकरणाचा निर्णय शासनाने दि. 31 जानेवारीपर्यंत मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 

हमाल मापाडी महामंडळाचे जनरल सेके्रटरी बापूसाहेब मगदूम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगली माथाडी मंडळासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार शरद पाटील, भाजपचे दिनकर पाटील, मनसेचे नितीन शिंदे, काँग्रेसच्या जयश्री पाटील,  स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे तसेच सतीश साखळकर, अश्रफ वांकर, अजित सूर्यवंशी, अमर पडळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, गोविंद सावंत, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, बजरंग खुटाळे, श्रीमंत बंडगर, शालन मोकाशी तसेच विविध विभागाकडील माथाडी संघटनांचे पदाधिकारी व हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राज्यातील 36 माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ स्थापन्याचे तसेच माथाडी कायद्यात बदल करण्याचे धोरण शासनाने मागे घ्यावे. जिल्हा माथाडी मंडळात सर्व अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून मंडळे सक्षम करावीत, माथाडी कायद्याची सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. 

बापूसाहेब मगदूम म्हणाले, केंद्र, राज्य सरकारच्या कामगार, कष्टकरीविरोधी धोरणांमुळे कामगार, कष्टकर्‍यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे संघटित विरोध आवश्यक बनला आहे. 

शरद पाटील म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगारांविरोधातील आहे. या सर्वांनी एकत्र येऊन शासनाविरोधात तीव्र संघर्ष करण्यास सिद्ध झाले पाहिजे. दिनकर पाटील म्हणाले, खासदार संजय पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून हमाल, मापाडींच्या भावना शासनाला कळविल्या जातील.