Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Sangli › प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया घोटाळा

प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया घोटाळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

खासगी दवाखान्यात झालेल्या प्रसुती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखवल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गैरमार्गाने ‘टार्गेट’ पूर्ण करण्याबरोबर आर्थिक लाभावर डल्ला मारला जात आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात हा  प्रकार चव्हाट्यावर आला आहे. मात्र चौकशी रखडल्याचे वृत्त आहे. दरम्यान जिल्ह्यात अन्यत्रही हा ‘घोटाळा’ सुरू आहे का? याचीही चौकशी होण्याची गरज आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुटूंब कल्याण योजना राबविण्यात येते. स्त्री शस्त्रक्रिया व पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जातात. स्त्री शस्त्रक्रियांची संख्या लक्षणीय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना कुटूंब नियोजन शस्त्रक्रियांचे टार्गेट दिलेले असते. सर्वोधिक शस्त्रक्रिया केलेल्या आरोग्य केंद्राला तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांना पुरस्काराने गौरवले जातेे. मात्र गैरमार्गाने टार्गेट पूर्ण करणे आणि शासन अनुदानावर डल्ला मारण्याचे प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील या प्रकाराबाबतच्या तक्रारीवर दोन-तीन महिन्यांपासून चौकशीही सुरू आहे. खासगी दवाखान्यात झालेल्या शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखविले जात असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्याची जोरात चर्चा सुरू आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील काही खासगी दवाखान्यात झालेल्या कुटूंब नियोजन स्त्री शस्त्रक्रिया  जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रात दाखवल्या जातात. टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा उद्योग केला जात असल्याची चर्चा आहे. 

माता मृत्यूंमध्ये प्रसूती दरम्यान होणार्‍या मृत्यूंची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्व प्रसुती आरोग्य संस्थांमध्ये होणे गरजेचे आहे. खासगी दवाखाने,  आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये प्रसुतींची संख्या वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही प्रसुतींचे प्रमाण वाढले आहे. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डचा दर्जा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दरमहा 10 प्रसुतींचे टार्गेट असते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी खासगी दवाखान्यात झालेल्या प्रसुतीही काही आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखविले जात असल्याची चर्चा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल होणार्‍या मातेला तीन दिवस मोफत आहारासाठी प्रतीदिन 100 रुपये अनुदान देण्याची सुविधा आहे. गैरमार्गाने टार्गेट पुर्ण करण्याबरोबरच या आहार अनुदानावर डल्ला मारण्याचे काही प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. 

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आर्थिक लाभ 650 ते 1000 रु.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लाभार्थींना शासनाकडून मोबदला दिला जातो. स्त्री नसबंदीसाठी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीला 250 रुपये, बीपीएल, अनुसूचित जाती, जमाती लाभार्थीसाठी 600 रुपये, शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणार्‍याला 150 रुपये, औषधासाठी 100 रुपये, तज्ज्ञाची फी 75 रुपये, भूलतज्ज्ञाची फी 25 रुपये, स्टाफ नर्स/परिचारीका फी 15 रुपये, ओ. टी. तंत्रज्ञ, मदतनीससाठी 10 रुपये, श्रमपरिहार 10 रुपये, शिबिर व्यवस्थापनसाठी 10 रुपये असा लाभ शासन देते. एका शस्त्रक्रियेसाठी 650 ते 1 हजार रुपये लाभ दिला जातो.