Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Sangli › सरकारच्या घातक धोरणाविरोधात लढा 

सरकारच्या घातक धोरणाविरोधात लढा 

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

भाजप सरकारची धोरणे सामान्यांसाठी घातक आणि त्यांचे शोषण करणारी आहेत. त्या विरोधात संघटित होऊन तीव्र लढा देण्याचा निर्धार शनिवारी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात समारोपप्रसंगी करण्यात आला. 

मराठा समाज भवनमध्ये सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 22 व्या राज्य अधिवेशनाची आज सांगता झाली. शेतकर्‍यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळावी, भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करून दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी, आदी ठराव करण्यात आले. 

अन्य ठराव असे : सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, गारपीट आणि बोंड अळी नुकसानग्रस्त पिकांची शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. 

शिक्षणाप्रमाणे आरोग्य सुविधा सर्वांना मिळण्याचा अधिकार असावा, कामगार कायद्यात बदल करावा, अपंग, निराधार शेतकरी आणि शेतमजूर यांना प्रती महिना पाच हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे, महिलांवरील अत्याचार थांबवावेत, नोकरभरतीवर असलेली बंदी उठवण्यात यावी, अल्पसंख्यांकावरील हल्ले थांबवावेत आदि ठराव मांडण्यात आले.   

प्रसार माध्यमांना खुल्या नसलेल्या दोन दिवसांच्या बैठकांत माजी खासदार सीताराम येच्युरी, माजी आमदार नरसय्या आडम, सुधा सुंदररामन, व्ही. वाय. पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील सहभागी झाले होते. 

शनिवारच्या बैठकीत पक्षाच्या विविध विभागांचा  गेल्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. कुणी किती आंदोलने केली, कोणते प्रश्‍न मार्गी लावले, पक्ष, संघटना वाढीसाठी काय नियोजन केले, त्याला किती यश आले आणि पुढील तीन वर्षांसाठी काय करता येईल, याचा आढावा घेण्यात आला. 

किसान आघाडीचा डॉ. अजित नवले, शेतमजूर आघाडीचा आढावा मारुती खंदारे, विद्यार्थी आघाडीचा बालाजी कलेटवाड, महिला आघाडीचा सोन्या गील आणि कामगार आघाडीचा  अ‍ॅड. एम. एच. शेख यांनी आढावा घेतला.