Thu, Jul 18, 2019 17:11होमपेज › Sangli › सांगलीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन

सांगलीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:28PMसांगली : प्रतिनिधी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन दिवसांचे 22 वे राज्य अधिवेशन गुरुवारपासून येथील मराठा समाज भवनमध्ये होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय नेत्यांसह राज्यभरातील 400 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस कॉ. उमेश देशमुख यांनी दिली. 

ते म्हणाले, अधिवेशनासाठी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, माजी खासदार निलोत्पल बसू, डॉ. अशोक   ढवळे, आमदार जे. पी. गावीत, ज्येष्ठ नेते नरसय्या आडम  उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी  दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. स्टेशन चौकात रॅलीची सांगता होऊन तेथे जाहीर सभा होणार आहे. 

सभेसाठी सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रतिनिधी सत्र होणार आहे. शुक्रवारी ( दि. 16) गेल्या तीन वषार्ंतील  कामांचा अहवाल मांडण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी त्यावर चर्चा करणार आहेत.  शनिवारी कॉ. नरसय्या आडम चर्चेला उत्तर देणार आहेत. त्यानंतर नवीन राज्य समितीची आणि हैद्राबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. 

अधिवेशन स्थळाला कॉ. कार्ल मार्क्सनगर असे नाव देण्यात आले आहे. दोन स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. एका बाजूस क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी तर दुसर्‍या बाजूस क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड प्रवेशव्दार असे नाव देण्यात येणार आहे. सभागृहास क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची नावे देण्यात आली आहेत. अधिवेशनासाठीच्या मंचास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  तर जाहीर सभेच्या    मंचास छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले आहे, असेही कॉ. देशमुख यांनी सांगितले.