Thu, Jan 24, 2019 13:58होमपेज › Sangli › भाटवाडीत विवाहितेची आत्महत्या

भाटवाडीत विवाहितेची आत्महत्या

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:38AMकासेगाव : प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील भाटवाडी येथील सुरेखा शहाजी पवार (वय 42) या विवाहितेने बुधवारी गावातीलच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  त्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या (बहादूरवाडी) सुमारे 150 जणांच्या जमावाने भाटवाडीत येऊन सासरच्या घरातील साहित्याची मोडतोड केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शहाजी पवार याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सुरेखा पवार हिचे माहेर बहादूरवाडी आहे. सुरेखाचा भाऊ संभाजी खोत यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  पती शहाजी, सासू लक्ष्मी, जाऊ आनंदी यांच्याकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून सुरेखाने आत्महत्या केली  आहे. कासेगाव पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला  आहे. 

सुरेखा पवार हिने बुधवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भाटवाडी-काळमवाडी रस्त्यावरील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  ही माहिती कळताच तिच्या माहेरकडील सुमारे 150 लोकांनी भाटवाडीत धाव घेतली. त्या जमावाने शहाजी पवार यांच्या घरावर हल्ला करून  साहित्याची मोडतोड करून विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यास  विरोध केला. अंत्यसंस्कार घरासमोरच करणार, असा पवित्राही त्यांनी घेतला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ गावात येऊन बहादूरवाडीच्या लोकांची समजूत काढून त्यांना शांत केले. 
पोलिसांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.  मृत सुरेखाला अभिषेक हा एकुलता एक मुलगा आहे.   पोलिस उपनिरीक्षक पवन चौधरी तपास करीत आहेत.