Sat, May 30, 2020 23:34होमपेज › Sangli › बाजारपेठ सुरळीत; गर्दी पांगली

बाजारपेठ सुरळीत; गर्दी पांगली

Last Updated: May 22 2020 9:02PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शुक्रवारी पूर्णक्षमतेने बाजारपेठा सुरू झाल्या. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सकाळी थोडा काळ खरेदीसाठी बाजारपेठेत वर्दळ दिसली. परंतु दुपारी 12 नंतर पुन्हा गर्दी पांगली. त्यामुळे व्यापार्‍यांना ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसावे लागले. मुख्य आणि उपनगरातील रस्ते ओस पडले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी दि. 20 मार्चपासून बाजारपेठा शटरडाऊन झाल्या होत्या. त्यामुळे मुख्य दत्त-मारुती रस्ता, गणपती पेठ, हरभट रोड, सराफ पेठ, कापडपेठ, बसस्थानक परिसर, झुलेलाल चौक-सिव्हिल रस्ता, स्टेशन रोड, विश्रामबागसह उपनगरातील सर्वच व्यवहार ठप्प होते. खाद्यपदार्थ तसेच अन्य जीवनोपयोगी साहित्य विक्री करणारे हातगाडे, फेरीवाले, तीनही शहरातील भाजी मार्केटही बंद होते. फक्त अत्यावश्यक सेवेला परवानगी होती. तरीही लोक रस्त्यावर खरेदीच्या निमित्ताने गर्दी करीत होते. 

दरम्यान, दि. 17 मेपासून सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु हे करताना मॉल, व्यापारी संकुलांना तसेच शहरातील बाजारपेठांना बंदी होती. त्यानंतर दि. 19 तारखेपासून एकेरी मार्गाने आलटून-पालटून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. आज शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण बाजारपेठा सुरू झाल्या. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्व व्यवहार खुले झाल्याने जनजीवन सुरळित झाले. सर्वच क्षेत्रातील खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरल्याने वर्दळ दिसून आली. मात्र दत्त-मारुती रस्ता व गणपती पेठ वगळता अन्य बाजारपेठांमध्ये तुरळक संख्येने ग्राहक दिसून आले. अवघ्या तास-दोन तासात त्या बाजारपेठा व रस्ते पुन्हा ओस पडले. दुपारी 12 नंतर सर्व रस्तेच रिकामे झाले. परिणामी दुकानदार, व्यावसायिकांना ग्राहकांच्या प्रतीक्षेत रहावे लागले. दुपारनंतर  संपूर्ण बाजारपेठाच ओस होत्या. पहिल्याच दिवशी अशी अवस्था होती. 

लोकांकडे पैसाच नसल्याचा परिणाम
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, गर्दी होईल, या शंकेमुळे व्यापारपेठा बंद ठेवण्याऐवजी सर्वच व्यवहार सुरू ठेवावेत यासाठी आम्ही आग्रही होतो. आता व्यवहार सुरू झाल्यानंतर गर्दीचा बागुलबुवा फोल ठरला आहे. लॉकडाऊनमुळे 60 दिवसांत सर्व व्यवहार ठप्प झाले. परिणामी जनतेच्या हाती  पैसाच नाही. त्यामुळे बाजारेपठेत गर्दी कमी आहे. आता उद्योग-धंदे सुरू झाले तर हातात पैसा येऊन बाजारपेठेत लोक येतील. तोपर्यंत मात्र असाच परिणाम राहणार आहे. 

पान दुकाने सुरू

सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारपासून पानपट्ट्या सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी दुकानदारांनी व्यवसायासह साफसफाई करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तब्बल साठ दिवसांच्या बंदनंतर पानपट्ट्या सुरू झाल्या आहेत.  मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळूनच व्यवसाय करण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांनी केले आहे. 

शुक्रवारपासून पानपट्ट्या सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊपासून शहरातील पानपट्ट्या सुरू झाल्याचे चित्र होते. मात्र अनेक दुकानदारांनी सकाळी साफसफाईलाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. शिवाय पहिला दिवस असूनही ग्राहकांची संख्या मात्र फारशी नसल्याचे दिसून येत होते. 

पानपट्टीधारकांना केवळ ग्राहकांना  पार्सल देण्याचीच परवानगी देण्यात आली आहे. शिवाय सार्वजनीक ठिकाणी थुंकणार्‍यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,  त्यामुळेही  ग्राहक कमी झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.

धान्य मार्केटमधील झुंबड ओसरली

‘लॉडडाऊन’ शिथील झाले आहे. बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. सर्वत्र वर्दळ दिसून येत आहे. मात्र धान्य मार्केटमधील झुंबड कमी झाली आहे. जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. आवक वाढली आहे, वाहतूक भाडे कमी झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून धान्य, कडधान्याचे घाऊक दर क्विंटलला 100 ते 200 रुपयांनी कमी झाले आहेत. 

जीवनावश्यक वस्तू म्हणून धान्यबाजार ‘लॉकडाऊन’मध्येही सुरू होता. गेल्या दोन महिन्यात मार्केट यार्डात धान्य, कडधान्ये खरेदीसाठी झुंबड उडत असे. धान्य, कडधान्य खरेदीची उलाढाल विक्रमी झाली आहे. वर्षभर, सहा महिन्यांसाठी काही लोक मार्केट यार्डातून एकदाच खरेदी करतात. ती खरेदीही आता बर्‍यापैकी संपली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने सांगलीत अनेक ठिकाणांहून होणारी आवकही सुरळीत झाली आहे. मागणीचे प्रेशर कमी झाले आहे.  

वाहतूक भाडे वअन्य खर्चही कमी झाले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून अन्नधान्य, कडधान्याचे घाऊक दर कमी झाले आहेत, अशी माहिती सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक अण्णासाहेब चौधरी यांनी दिली. 

जिल्हा परिषद गजबजली

जिल्हा परिषद मुख्यालय इमारत कर्मचार्‍यांनी पुन्हा गजबजली आहे. मात्र कामानिमित्त येणार्‍यांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील पोर्चपर्यंतच प्रवेश होता. अर्ज, निवेदन, टपाल पोर्चमध्येच घेऊन संबंधित विभागाकडे पाठविली जात होते. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयात सुरूवातीला केवळ 5 टक्के कर्मचारी उपस्थिती होती. त्यानंतर उपस्थिती 10 टक्के, 33 टक्के झाली. शुक्रवारपासून  उपस्थिती 100 टक्के झाली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालय कर्मचार्‍यांनी गजबजले. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करून कामकाज सुरू झाले आहे.