Wed, Nov 21, 2018 19:27होमपेज › Sangli › बाजार समितीच्या कामावर ‘पणन’ असमाधानी

बाजार समितीच्या कामावर ‘पणन’ असमाधानी

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : प्रतिनिधी

‘ई-नाम’ च्या अंमलबजावणीत सुधारणा होत नसल्याने राज्य कृषी पणन मंडळाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाराजी  व्यक्त केली आहे. शेतीमालाच्या आवकेच्या प्रमाणात ‘इन गेट एंट्री’ अतिशय कमी आहे. शेतीमालाचे ‘ई-लिलाव’ होताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘ई-पेमेंट’ चे प्रमाण ‘झिरो’ आहे. या सार्‍याचा परिणाम म्हणून ‘पणन’ ने असमाधान व्यक्त केले आहे. 

‘ई-नाम’ (राष्ट्रीय कृषी बाजार) हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शेतीमालास चांगला दर मिळावा व शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी शेतीमालाचे ऑनलाईन सौदे सुरू करण्याचे निर्देश आहेत. पहिल्या टप्प्यात सौद्याच्या ठिकाणी हजर असलेल्या खरेदीदारास भाग घेता येत आहे. नजिकच्या काळात ‘ई-लिलाव’ ची व्याप्ती वाढून महाराष्ट्र व देशातील खरेदीदारांना ‘ई-लिलाव’ मध्ये ऑनलाईन सहभाग घेता येणार आहे. त्यातून स्पर्धा होईल व शेतीमालाला चांगला भाव मिळेल.

30 लाख अनुदान खर्च, पण...!

केंद्र शासनाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीस सन 2016 मध्ये ‘ई-नाम’मध्ये समाविष्ट केलेले आहे. ‘ई-नाम’अंतर्गत तांत्रिक सज्जतेसाठी 30 लाख रुपयांचे अनुदानही दिलेले आहे. या अनुदानातून ‘ई-लिलाव’ यंत्रणा सज्ज झालेली आहे. मात्र पारंपारिक पद्धतीने बोली लावूनच शेतीमालाचे सौदे सुरू आहेत. 

हळद, गूळ, मिरची, अन्नधान्य आदी सर्वच शेतीमालाचे ‘ई-लिलाव’ सुरू करण्याचे ‘पणन’चे आदेश आहेत.   मात्र सांगलीत अजून हळद, गूळ, मिरची, अन्नधान्यच्या ‘ई-लिलाव’चा ‘श्रीगणेशा’ही झालेला नाही. बेदाण्याचे ई-लिलाव केवळ दाखवण्यापुरतेच निघाले आहेत. 

‘ई-नाम’ची अंमलबजावणी अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने पणन मंडळाकडून बाजार समित्यांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. पण त्यात सुधारणा होताना दिसत नाही. पणन मंडळाने बाजार समितीच्या जुलै 2018 च्या कामकाजाचा अहवाल पाठविला आहे. शेतीमालाची होत असलेली आवक व त्या प्रमाणात झालेली इन गेट एंट्री साधारण असल्याचे म्हटले आहे. इन गेट एंट्रीच्या तुलनेत झालेली ई-लिलाव संख्या असमाधानकारक असल्याचे नमूद केले आहे. एकाही शेतकर्‍यांना ई-पेमेंट झालेले नाही. ‘ई-नाम’ला सहकार्य न करणार्‍या अडते, खरेदीदार व्यापार्‍यांचे परवाने रद्द करा, अशा सुचनाही पणन मंडळाने बाजार समितीस दिलेल्या आहेत.