Thu, Jun 20, 2019 01:27होमपेज › Sangli › बाजार समितीच्या १० कोटींच्या निविदा रद्द

बाजार समितीच्या १० कोटींच्या निविदा रद्द

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 7:42PMसांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 10 कोटींच्या 12 कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. जादा दराच्या निविदांना बहुसंख्य संचालकांनी विरोध केला आहे. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला आहे. बाजार समिती संचालक मंडळ सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. 

सांगली मुख्य बाजार आवार, विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केट, मिरज दुय्यम बाजार आवार,  कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार, ढालगाव तसेच जत दुय्यम बाजार आवारात 12 कोटी रुपयांच्या 18 कामांसाठी बाजार समितीने निविदा मागविल्या होत्या. निविदा उघडल्यानंतर माजी सभापती भारत डुबुले यांनी गंभीर आरोप केले होते. 

अंदाजपत्रकीय किंमत वाढीव असणे, जादा दराच्या निविदा याद्वारे बाजार समितीचे 2.30 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला होता. 

दरम्यान, त्यावर बाजार समितीमार्फत स्पष्टीकरण दिले होते. बाजार समितीच्या कामांना 18 टक्के जीएसटी लागू झालेला आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी 5 टक्के व्हॅटनुसार अंदाजपत्रके केली होती. त्यामुळे जादा दराच्या निविदा दिसत असल्याचे स्पष्टीकरणात म्हटले होते. 

मात्र आता बाजार समितीच्या बहुसंख्य संचालकांनी जादा दरांच्या निविदांवर बोट ठेवत फेरनिविदा काढण्याचा आग्रह कायम ठेवला आहे.सहा कामांच्या निविदा अंदाजपत्रकीय दराच्या आहेत. बारा कामांच्या निविदाच जादा दराने कशा? सहा कामांनाही ‘जीएसटी’ लागू असताना त्यांच्या निविदा जादा दराने नाहीत, पण बारा कामांच्याच निविदा जादा कराने कशा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. बाजार समितीचे 1.27 कोटी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी जादा दराच्या 12 कामांच्या फेरनिविदा काढणेच योग्य असल्याचे काही संचालकांनी सांगितले. 

फेरनिविदांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचेही काही संचालकांनी सांगितले.