होमपेज › Sangli › बाजार समितीचे २.३० कोटींचे नुकसान

बाजार समितीचे २.३० कोटींचे नुकसान

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:34PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कामांचे वाढीव अंदाजपत्रक, जादा दराच्या निविदांमुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला 2.30 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. बाजार समितीच्या पैशाची ही उधळपट्टी आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी करावी, अशी मागणी माजी सभापती भारत डुबुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डुबुले म्हणाले, सांगली मुख्य बाजार आवार, फळे व भाजीपाला मार्केट, मिरज, कवठेमहांकाळल, ढालगाव, जत दुय्यम बाजार आवारात 12 कोटी रुपयांच्या 18 कामांसाठी बाजार समितीने निविदा काढल्या आहेत. शासकीय दरसुची पाहता दहा ते बारा कामांची अंदाजपत्रकीय किंमत वाढीव आहे. अपवाद वगळता कामे 18 टक्क्यांपर्यंत जादा दराने आहेत. त्यातून बाजार समितीचे सुमारे 2.30 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

निविदांमध्ये स्पर्धा नाही- डुबुले

डुबुले म्हणाले, बाजार समितीच्या कामांच्या निविदांमध्ये स्पर्धा झाली नाही.  काही कारभार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे संगनमत झालेले आहे. स्थळ पाहणी दाखला हा फंडा त्यासाठीच अवलंबला आहे. काही कामांच्या निविदा पाहिल्या तर एकाच कुटुंबातील मक्तेदार दिसतात. तेच ते मक्तेदार अनेक कामांमध्ये आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. 

आर्किटेक्टची सनद रद्द करा

डुबुले म्हणाले, कामांची वाढीव अंदाजपत्रके केलेल्या आर्किटेक्टची सनद रद्द करावी. संबंधित आर्किटेक्टने यापूर्वी विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कामे केली होती. ती सदोष आहेत. दुकान गाळे गळके आहेत. अशाच आर्किटेक्टला बाजार समितीच्या पॅनलवर कशासाठी ठेवले आहे, असा सवाल डुबुले यांनी केला आहे.