होमपेज › Sangli › बाजार समितीत मदनभाऊ गटाला सभापतीपद!

बाजार समितीत मदनभाऊ गटाला सभापतीपद!

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 11:41PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मदनभाऊ गटाला सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागणार आहे. दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यात सभापतीपदासाठी रस्सीखेच आहे. दरम्यान डॉ. पतंगराव कदम व मदनभाऊ गटाचे बहूमत होत असल्याने वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे. गुरूवारी (दि. 11) सभापती, उपसभापती निवड होणार आहे. 

बाजार समितीत ‘टीम पतंगराव’ सत्तेत आली. मात्र वर्षातच या टीममध्ये मतभेदाचे वारे वाहू लागले. या टीममधील विशाल पाटील गट व अजितराव घोरपडे गट डॉ. कदम गटापासून दुरावला, तर विरोधातील मदनभाऊ गटाचे डॉ. कदम गटाशी सख्य निर्माण झाले. दि. 23 नोव्हेंबर 2016 च्या सभापती निवडीवेळी सत्ताधारी ‘टीम पतंगराव’मधील मतभेद चव्हाट्यावर आले. विशाल पाटील, घोरपडे यांनी केलेला सत्ता परिवर्तनाचा बेत थोडक्यात हुकला होता. 
या सर्व पार्श्‍वभूमीवर सभापतीबदल थोडा लांबणीवर पडला. मात्र सभापती निवडीत वेगळे राजकारण, दगाबाजी घडणार नाही;  डॉ. कदम ठरवतील तेच सभापती व उपसभापती होतील, असा विश्‍वास बहूसंख्य संचालकांनी दिला. त्यामुळे सभापती, उपसभापती बदलास हिरवा कंदिल मिळाला. त्यानुसार डॉ. कदम गट, मदनभाऊ गट, घोरपडे गट, विशाल पाटील गट, स्वाभीमानी शेतकरी संघटना असे सर्व गट-तटाचे संचालक एकत्रितपणे सहलीवर गेले आहेत. 

सभापती, उपसभापती निवडीसाठी प्रांताधिकारी यांनी गुरूवारी संचालक मंडळाची विशेष सभा बोेलवली आहे. सभापतीपद मिरज तालुक्याला दिले जाणार असल्याचे सत्ताधारी गटाने स्पष्ट केले आहे. मिरज तालुक्यातून दिनकर पाटील (सोनी), वसंतराव गायकवाड (बेळंकी), कुमार पाटील (मौजे डिग्रज) तसेच घोरपडे गटाचे जीवन पाटील (करोली एम), दीपक शिंदे (डोंगरवाडी) तसेच विशाल पाटील गटाचे संचालक अण्णासाहेब कोरे हे सभापतीपदासाठी इच्छुकांच्या यादीत आहेत. सभापतीपद मदनभाऊ गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यानुसार दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यात रस्सीखेच आहे.