होमपेज › Sangli › बाजार समिती सभापती शेजाळ यांचा राजीनामा

बाजार समिती सभापती शेजाळ यांचा राजीनामा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:33PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बुधवारी पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडे सादर केला. मंगळवारी उपसभापती रामगोंडा संती यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. दरम्यान,  सभापतीपदासाठी पाच संचालकांमध्ये रस्सीखेच आहे. 

बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, उपसभापती रामगोंडा संती यांची निवड दि. 23 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. सभापती, उपसभापतींना एक वर्षाचा कार्यकाल निश्‍चित केला होता. त्यामुळे ऑक्टोबरपासूनच काही संचालक व इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. नेत्यांनी सभापती, उपसभापती बदलाच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला. मंगळवारी उपसभापती संती यांनी सभापती शेजाळ यांच्याकडे राजीनामा दिला. शेजाळ यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. बुधवारी शेजाळ यांनी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविला.

पहिला दिवस विजापूर, अलमट्टी

वीस दिवसात नवीन सभापती निवड होईल, असे संकेत मिळत आहेत. सत्ताधारी गटाने 12 संचालकांना सहलीवर पाठविले आहे. यामध्ये डॉ. पतंगराव कदम गट, मदनभाऊ गट, अजितराव घोरपडे गट व विशाल पाटील गटाचे समर्थक संचालक असल्याचे सांगितले जात आहे. बारा संचालकांनी बुधवारी विजापूर, अलमट्टीची सैर केली. 

अभिजित चव्हाण (डफळापूर), दिनकर पाटील (सोनी), वसंतराव गायकवाड (बेळंकी), कुमार पाटील (मौजे डिग्रज),  जीवन पाटील (करोली एम) हे संचालक सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, सभापतीपदाच्या निवडणुकीत काही राजकीय दगाफटका होणार नाही याची दक्षता सत्ताधारी गटातर्फे घेतली जात आहे. सभापतीपदाचा उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार संचालकांनी सत्ताधारी नेते डॉ. पतंगराव कदम यांना दिले आहेत.