Tue, Apr 23, 2019 13:58होमपेज › Sangli › मुलांना एटीएम मशीन नको; माणूस बनवा

मुलांना एटीएम मशीन नको; माणूस बनवा

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:03PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

प्रत्येक शिक्षित पालकांना आपला मुलगा नोटा देणारे एटीएम मशीन व्हावे असेच वाटत आहे. बालपण कुरतडणारे शिक्षण देण्यापेक्षा तसेच त्यांचे एटीएम मशीन बनविण्यापेक्षा त्यांना माणूस बनवा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजन गवस  यांनी केले. 

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित अण्णासाहेब लठ्ठे जयंती महोत्सव व आदर्श सेवक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.

डॉ. गवस म्हणाले, सध्या सर्वत्र इंग्रजी शाळांची दुकानदारी जोरात सुरू आहे. सर्वच पालक आपल्या मुलांना   इंग्रजी शाळांत घालण्याचा अट्टाहास करीत आहेत. मात्र मुलांचा विकास मातृभाषेतील शिक्षणातून होतो, असा सिद्धांत जागतिक पातळीवर मान्य केला आहे. मात्र त्याकडे पालक  दुर्लक्ष करीत आहेत. 

कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील, आण्णासाहेब लठ्ठे यांनी ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवून कमविण्यासह शिकण्याची प्रेरणा त्यांनी मुलांना दिली. चालकांच्या दृष्टीकोनावर संस्थेची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे आमची संस्था अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विचारांवरच चालते. 

अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन  करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शांतिनाथ कांते यांनी  प्रास्ताविक केले. मानद सचिव सुहास पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. धन्यकुमार मंडपे, प्राचार्य रमेश चराटे, अधीक्षक सुकुमार चौगुले, शिक्षिका विशाखा चोराडे, विद्यार्थिनी सविता रूपनर यांचा आदर्श सेवक पुस्कार देऊन सत्कार करण्यात आला.  अशोक पाटील, प्रमोद चौगुले, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब पाटील,  शांतीनाथ चौगुले, प्रकाश झेले, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कोडग उपस्थित होते. प्रा. स्वाती पाटील, प्रा. सोनाली पाटील यांनी सूत्रसंचलन केले.