Mon, Jun 17, 2019 18:23होमपेज › Sangli › मराठा राज्यकर्त्यांना बुडवायचे षङयंत्र

मराठा राज्यकर्त्यांना बुडवायचे षङयंत्र

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 8:31PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

सहकाराचा फायदा मराठा समाजाला होत आहे. सहकार बदनाम करून राजकारणातील मराठा राज्यकर्त्यांना बुडवायचे षङयंत्र सुरू आहे, असा आरोप मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. येथील पंचायत समितीच्या बचतधाममध्ये झालेल्या  मराठा सेवा संघाच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. 

खेडेकर म्हणाले, आज शेतीचे तुकडे झाले आहेत. शेतीवरील बोजा वाढत गेला आहे. नोकर्‍या, शिक्षण नाही. यामुळे मराठा तरूण अस्वस्थ आहे. आपल्या कौशल्यावर, कलेवर उभा राहून चरितार्थ चालविण्याची गरज आहे. ते म्हणाले, मराठा आंदोलनाला नेतृत्व नाही. सततच्या बंदमुळे मराठ्यांबद्दल इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. आरक्षणाबरोबर शेतकर्‍यांचे प्रश्‍न, गोदामाचे प्रश्‍न, वसतीगृहांचे प्रश्‍न अशा 20 मागण्या बाजूला पडल्या आहेत. आरक्षण मिळण्याबरोबरच समाजाचे इतर प्रश्‍नही सुटले पाहिजेत. 

ते म्हणाले, 1962 च्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळत होते. मात्र मतांसाठी राज्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्यांना ओबीसीमधून वगळण्यात आले. 340 कलमाअंतर्गत केंद्राला, राज्याला आरक्षणाबाबत अधिकार आहेत. मात्र सरकार याबाबत उदासीन आहे. कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे म्हणाले, मराठा सेवा संघाचे काम 37 देशांमध्ये सुरू आहे. मराठा समाजाचा सर्वांगिण विकास हे संघाचे धोरण असून संत गाडगेबाबा, संतश्रेष्ठ तुकाराम, डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी लढाई सुरू आहे. संघाच्या 33 कक्षांच्या संघटना आहेत. सेवा संघाची 100 कोटींपेक्षा स्थावर मालमत्ता असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची सोय करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दिनकर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तमराव माने, गटविकास अधिकारी शिंदे, उमेश कुरळपकर, जयराज पाटील, बी. जी. पाटील आदी उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी सेवा संघात दाखल व्हावे...

मराठा अधिकार्‍यांना नोकरीमध्ये अडचणीत आणण्यासाठी काही लोकांकडून प्रयत्न केले जात आहेत. समाजाला आरक्षण नसल्याने पदोन्नतीत डावलले जात आहे. समाजाच्या लढ्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी मराठा सेवा संघात दाखल व्हावे, असे आवाहन तनपुरे यांनी केले.

समाजाचे दुखणे पैसा...

मराठा समाजाच्या रडगाण्याचे दुखणे पैसा आहे.  मराठा समाजाने पैशांचे स्त्रोत निर्माण करायला हवेत. आधी आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या प्रबळ करा. कुटुंब बांधल्यानंतरच मग समाज बांधण्यासाठी सक्रिय व्हा. घरातील महिलांना बरोबरीने वागणूक द्या, असे आवाहन खेडकर यांनी केले.