Thu, Apr 25, 2019 14:01होमपेज › Sangli › मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा, रास्ता रोको

मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा, रास्ता रोको

Published On: Jul 28 2018 1:40AM | Last Updated: Jul 28 2018 12:35AMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मिरज, तासगाव, कडेगाव तालुक्यांत आंदोलन करण्यात आले. कडेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने  तहसील कार्यालयावर  ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकवल्याने पोलिस व आंदोलकांत वादावादी झाली. राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोको करण्यात आला. 

कडेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी हजारोंच्या संख्येने मोर्चा  काढण्यात आला. दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी नसल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयाचे प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. 
त्यामुळे पोलिस आणि आंदोलक वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे दगडाने फोडले. आंदोलकांचे व्हिडिओ चित्रकरण करण्यार्‍या एका पोलीस कर्मचार्‍यास दगड मारण्याचा प्रयत्न केला.  काही आंदोलकांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही  तहसीलदार कार्यालयात घुसून  कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला. 

यानंतर संतप्त आंदोलकांनी कडेगाव बसस्थानकाजवळ विजापूर- गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर  टायर पेटवून तब्बल तीन तास रास्ता रोको केला. दरम्यान कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख हे आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महामार्गावर आंदोलनस्थळी आले. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यास  नकार दिला . यावेळी  प्रचंड गर्दीत काही आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रांताधिकार्‍यांना बोलावून  आंदोलकांनी निवेदन सादर केले. 

तालुक्यातील वांगी, चिंचणी, अंबक येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.  मिरज तालुक्यातील सोनी, पाटगाव, भोसे येथे गाव बंद ठेवण्यात आला. सोनी येथे सरपंच व पोलिस पाटील यांना निवेदन देण्यात आले. म्हैसाळ (ता. मिरज) येथे आंदोलनाला पाठिंबा म्हणून गाव बंद ठेवण्यात आले. सकल मराठा समाजाच्यावतीने  आबासाहेब शिंदे चौकातून निषेध फेरी काढण्यात आली. आगळगाव बंद;आज ढालगाव बंद

नागज : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्यावतीने आगळगाव येथील सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला.गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढून बंदचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नागज फाट्यावर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. ढालगाव  बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे.